ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवलीच्या पत्रकारांनी जपलाय प्रगल्भतेने वाचकांचा विश्वास…!

कणकवलीच्या पत्रकारांनी जपलाय प्रगल्भतेने वाचकांचा विश्वास…!

प्रकाशन: 28 Feb 2022 12:29 AM
वाचन संख्या 53

कणकवली तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण व स्नेहमेळावा प्रसंगी मान्यवरांचे कौतुकोद्गार.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याची पत्रकारीता नेहमीच प्रगल्भ वैचारीक राहीली आहे. वाचकांचा विश्वास जपण्याचे काम कणकवली पत्रकार समितीने नेहमीच केले आहे. अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी ही समिती नेहमीच पुढे राहीली आहे. पत्रकार समितीने ही विश्वासाहर्तता यापुढेही कायम जपावी, अशा शब्दांमध्ये विविध मान्यवरांनी कौतुक केले. कणकवली तालुका पत्रकार समितीचा पारितोषीक वितरण सोहळा तसेच पत्रकार व कुटुंबियांचा स्नेहमेळावा रविवारी पिसेकामते येथील मैत्री गार्डन रिसॉर्ट येथे पार पडला. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी व्यासपिठावर तहसीलदार रमेश पवार, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष वायंगणकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक करंबेळकर, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, लावण्यसिंधू संस्थेचे चंद्रशेखर उपरकर, कणकवली पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई आदी उपस्थित होते . तसेच आमदार वैभव नाईक , शिवसेना नेते संदेश पारकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक , प्रतिथयश वकील ॲड. उमेश सावंत यांनीही कार्यक्रमस्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी यशस्वी उद्योजक पुरस्कार त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शनचे रघुनाथ नाईक तसेच विल्बर्ट प्रॉपर्टीचे विल्सन पिंटो व दिनेश कुंभार यांना प्रदान करण्यात आला . सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सर्पमित्र तथा फोंडाघाट हेल्प ॲकॅडमीचे संजय नेरूरकर यांना प्रदान करण्यात आला . पत्रकारीतेमधील बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी, शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर राणे , उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार गुरुप्रसाद सावंत, अनिल सावंत स्मृती ग्रामिण पत्रकार पुरस्कार ऋषीकेश मोरजकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कणकवली तालुका पत्रकार समिती आयोजित निबंध स्पर्धा तसेच कणकवली तालुका पत्रकार समिती व पत्रकार आणि मित्र यांच्या माध्यमातून आयोजित हस्ताक्षर स्पर्धेच्या विजेत्यांनाही गौरविण्यात आले.

वैशाली राजमाने म्हणाल्या, कणकवलीत काम करताना मला आलेला अनुभव आहे की, कणकवली तालुक्याची पत्रकारीता प्रगल्भ आणि वैचारीक आहे. वृत्तपत्रे ही प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण , कणकवली तालुक्यातील पत्रकारांनी वाचकांचा विश्वास जपण्याचे काम केले आहे. हीच विश्वसार्हता यापुढेही अखंडीत राहील, याची दक्षता कणकवली पत्रकार समितीने घ्यावी . कणकवली पत्रकार समितीने आपल्या क्षेत्रापुरते मर्यादिन न राहता सामाजिकतेचे भानही जपले आहे. आज पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये दिले गेलेले उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार हे त्याचेच उदाहरण आहे. प्रत्येक चांगल्या बाबीला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम कणकवली पत्रकार समितीने यापुढेही आयोजित करावेत.

राजमाने पुढे म्हणाल्या, आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. पत्रकार – लेखणी मराठी भाषा हे समिकरणच आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न होत असतानाच कणकवली तालुका पत्रकार समितीने घेतलेली सुंदर हस्ताक्षर स्पर्धा नक्कीच दखलमय आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्याचे प्रयत्न यामाध्यमातून झाले आहेत. एकीकडे बातमीदारीसाठी वेळ द्यावा लागत असल्याने पत्रकारांना त्यांच्या कुटुंबियांसाठी वेळ देणे शक्य नसते. अशावळी पत्रकार समिती आज आपल्या कुटुंबियांसह आयोजित केलेला स्नेहमेळावाही कौतुकास्पद आहे.

रमेश पवार म्हणाले, कणकवली तालुका पत्रकार समितीने अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा प्रसार करण्यासाठी असतात. सामाजिक प्रबोधन, समाजाच्या अडचणी सोडविणे, अन्यायग्रस्तांना न्याय देणे हेच पत्रकाराचे काम आहे. अर्थात कणकवली तालुक्यातील पत्रकार याबाबतीत नेहमीच अग्रस्थानी राहीले आहेत. एकीकडे कणकवली तहसील कार्यालय आवारातील अस्वच्छता लक्षात घेऊन कणकवली पत्रकार समितीने तेथे धाव घेतली आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला होता. ही सामाजिक जाणिवही लक्षवेधी आहे.

सचिन हुंदळेकर म्हणाले, कणकवली पत्रकार संघाचा हा कार्यक्रम छोटा असला तरी दिमाखदार आहे. पोलीस म्हणून कार्यरत असताना राज्यभर पोस्टींग झाल्या . पण , कणकवली तालुक्यासारखी पत्रकारीता इतरत्र क्वचितच दिसते. येथील पत्रकारीता ‘कॉपी पेस्ट’ नसून स्वतंत्र विचार करणारी आहे. येथील पत्रकार आपल्या वाचकांपर्यंत सत्य पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. आधुनिकतेत दिवसेंदिवस वाढ होत असून भविष्यात पत्रकारीतेतही बदल घडणार आहेत . कदाचित परग्रहावरूनही बातमीपत्रे सादर होतील. या आव्हानांसाठीही पत्रकारांनी सज्ज रहावे. लेखणी ही तलवारीपेक्षाही धारदार असते. त्यामुळे पत्रकारांनी विवेकबुद्दी जागृत ठेवून लेखणी वापरायला हवी.

गणेश जेठे म्हणाले, कणकवली पत्रकार समितीने मागील काही वर्षांपासून आयोजित केलेल्या ‘गेट टू गेदर’ची ख्याती आता राज्यभर पोहोचली असून याच संघापासून प्रेरणा घेऊन राज्यभरातील पत्रकार संघटनांमार्फत कुटुंबियांसह गेट टूगेदर’चे आयोजन केले जात आहे. पत्रकारांचे जीवन कष्टप्रद आहे. मात्र , जिल्ह्यासह कणकवलीतील पत्रकारांनी नेहमीच समाजहीत डोळ्यासमोर ठेवले.

प्रास्ताविकात चंद्रशेखर देसाई म्हणाले, कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे गेली अनेक वर्षे उद्योग, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना गौरविले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी निबंध, हस्ताक्षर अशा स्पर्धाही घेतल्या जातात. चोवीस तास कार्यरत रहावे लागणारा पत्रकार आपल्या कुटुंबियांना किती वेळ देतो, हा संशोधनाचा भाग आहे . याच उद्देशाने कणकवली पत्रकार संघाने कुटुंबियांसह स्नेहमेळाव्याची योजना आखली व ती मागील अनेक वर्षे अंमलातही आणली आहे. कणकवलीच्या पत्रकारीतेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कार्यक्रमाला तालुका पत्रकार समितीचे सचिव संजय राणे, उपाध्यक्ष उत्तम सावंत , विशाल रेवडेकर, मिलिंद डोंगरे, रंजिता तहसीलदार, विनोद जाधव, भास्कर रासम, उमेश परब, रमेश जामसंडेकर, तालुका पत्रकार समितीचे माजी अध्यक्ष अजित सावंत, संतोष राऊळ, भगवान लोके, लक्ष्मीकांत भावे, सर्व कार्यकारिणी सदस्य आदींसह तालुक्यातील पत्रकार व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पेटकर यांनी केले. तर आभार खजिनदार नितीन कदम यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स