ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष.

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष.

प्रकाशन: 28 Feb 2022 11:52 AM
वाचन संख्या 56

अतिथी लेखक : प्रविण पारकर. (ओझर विद्यामंदिर,कांदळगांव )

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व.

कांदळगांव | प्रवीण पारकर : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रावर पाश्चिमात्यांची मक्तेदारी आहे असे चित्र निर्माण केले जाते. पाश्चात्य वैज्ञानिक स्वतःलाच विज्ञानाचे जनक म्हणवून घेतात. जणू विज्ञान क्षेत्रातील पहिले किरण पाश्चात्य आकाशातच फाकले गेले आणि त्यामुळे अवघ्या विश्वाचे विकासचक्र गतीमान झाले आणि हे होत असताना पुर्वेकडील विज्ञानाचे आकाश मात्र अंधकारमय होते अशीच भारतातील लोकांची मनोधारणा होती. आणि या मनोधारणेला आपल्याच देशातील बुध्दीवादी व्यक्ती, संस्था आणि काही प्रसारमाध्यमे यांनी इतिहासाकडे दुर्लक्ष करत खतपाणी घातले. या गैरसमजामुळे आपल्या देशाला काही विज्ञान पंरपरा होती, वैज्ञानिक दृष्टी होती हेच नव्या पिढीला माहित नाही. त्यामुळेच आपला वैज्ञानिक दृष्टी आणि ज्ञान नाकारण्याचा प्रयत्न होतो आहे. वास्तविक आपला भारत फक्त धर्म आणि दर्शन क्षेत्रातच नाही, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही अग्रेसर होता. इतकेच नाही तर आमच्या पूर्वजांनी विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वयही साधला होता.
भारताने आतापर्यंत जगाला अनेक वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ दिले आहेत.
भारताचे नांव संपूर्ण जगात अभिमानाने उंचावणा-या अनेक महान व्यक्तीपैकी एक आहेत, चंद्रशेखर व्यंकट रामन अर्थात सी.व्ही.रामन. ‘प्रकाशाचे विकिरण‘ आणि ‘रामन प्रभाव‘ म्हणजेच ‘रामन इफेक्ट‘ यासारखे शोध लावून सी.व्ही.रामन भौतिकशास्त्रात उच्च स्थानी पोहोचले होते. त्यांना जगातील सर्वात मानाचा समजला जाणारा नोबल पुरस्कार, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न, लेनिन शांती पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 1929 मध्ये त्यांना ‘सर‘ हा किताब देण्यात आला.

चंद्रशेखर वेंकट रामण यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी झाला. त्यांचे वडिल चंद्रशेखर अय्यर आणि माता पार्वती अम्मल तामिळनाडू येथील तिरूचिरापल्ली येथे रहात असत. त्यांचे वडिल एस.पी.जी. कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. डॉ.रामण यांचे प्राथमिक शिक्षण विशाखापट्टनम् येथे झाले. चंद्रशेखर लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास केली होती. रामायण, महाभारत हे ग्रंथसुध्दा त्यांनी वाचले होते. 1903 मध्ये त्यांनी चेन्नईच्या ‘प्रेसिडेन्सी‘ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बी.ए.च्या परीक्षेत ते एकटेच प्रथमश्रेणीत पास झाले होते. त्यांना भौतिकशास्त्रात सुवर्ण पदक सुध्दा मिळाले होते. 1907 मध्ये त्यांनी मद्रास विश्वविद्यालयातून गणित विषयात एम.ए.पूर्ण केले. विद्यार्थी म्हणून शिकत असतानाच त्यांचे अनेक विषयांवर संशोधन चालू होते.

1906 मध्ये त्यांनी प्रकाशाचे वर्तन हा प्रबंध लिहिला होता जो लंडनच्या ‘फिलॉसॉफिकल पेपर‘ मध्ये प्रसिध्द करण्यात आला.
नोबेल पुरस्कार प्रदान सोहळ्यास जमलेल्या लोकांकडे पाहिल्यावर मला वाटले की, जणू हा गो-या लोकांचा महासागर आहे.मी एकमेव भारतीय या सभागृहात आहे. नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्तीच्या समोर त्यांच्या देशाचा ध्वज आहे. पण माझ्यासमोर माझ्या देशाचा घ्वज नसून ब्रिटिशांचा युनियन जॅक आहे. माझ्या देशाचा घ्वज माझ्यासमोर नाही ही गोष्ट मनाला सर्वाधिक चटका लावून जाणारी होती ही खंत डॉ.सी.व्ही. रामन यांनी  सन 1930 मध्ये नोबेल पुरस्काराच्या वेळी बोलून दाखविली.
भारतीय वेष परिधान करून रामन पुरस्कार सोहळ्याला गेले. अर्थात डोक्याला पगडी बांधलेल्या आणि ब्रिटिशांच्या गुलामगीरीत वाढलेल्या भारतीय शास्त्रज्ञाकडे लोक संमिश्र भावनेने पहात होते. पण आपण अजुनही ब्रिटिशांचे गुलाम आहोत याचं बोचरं दुःख त्यांना कायम सतावत राहिले. नोबेल पुरस्कार मिळविणारे ते पहिले अशियाई शास्त्रज्ञ होते. तमाम भारतीयांसाठी ती अभिमानाची बाब होती ‘रामन इफेक्ट‘ या नावाने त्यांनी केलेले संशोधन जगभरातील शास्त्रज्ञांसाठी मैलाचा दगड मानला जातो. कोणत्याही आधुनिक साधना शिवाय त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले होते.

एखाद्या द्रव पदार्थावर पडणारे प्रकाशकिरण आणि त्या द्रव पदार्थामधून बाहेर पडणारे प्रकाश किरण यांच्यामधे योग्य तो प्रकाश शोषक पदार्थ वापरल्यास वर्णपदामध्ये नविन रंगरेषा तयार होतात. एकच तरंगलांबी असलेले प्रकाश किरण काही पदार्थावर पडल्यास पदार्थातील रेणूंमुळे पदार्थाचे विकिरण होते आणि मूळ प्रकाशाच्या तरंगलांबी इतक्या किरणांबरोबरच वेगळी तरंगलांबी असलेले प्रकाश किरण दिसतात हे त्यांनी सिध्द केले यालाच ‘रामन इफेक्ट‘ असे नाव त्यांनी दिले. रामन यांच्या संशोधनानंतर केवळ 10 वर्षामध्ये दोन हजाराहून जास्त रासायनिक संयुगांची रचना ‘रामन इफेक्ट‘ च्या सहाय्याने निश्चित केली गेली. म्हणूनच त्यांचा हा शोध सर्वात महत्वाचा मानला जातो. याव्यतिरिक्त आणखी एका महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर रामन यांनी शोधलं होतं. युरोपातून समुद्रमार्गे भारतात येत असताना ‘आकाश निळे का असते‘? हा प्रश्न त्यांना पडला होता. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे मेहनत केली आणि अखेर त्यांना त्याचे उत्तर सापडले. जेव्हा प्रकाशकिरण अत्यंत लहान आकाराच्या कणावर पडल्यास ते सर्व दिशांना पसरतात याला प्रकाशाचे विकिरण म्हणतात. विकिरणामुळेच आकाश निळे दिसते. हे त्यांच्या लक्षात आले. सूर्यापासून निघालेला प्रकाश जेव्हा पृथ्वीवर पोहोचतो तेव्हा वातावरणात असलेले वायूचे रेणू आणि इतर सूक्ष्म कण त्याच्या वाटेत येतात. यावेळी कमी तरंगलांबी असलेल्या निळ्या रंगाचे जास्तीत जास्त प्रमाणात विकिरण होते व हा रंग जास्त प्रमाणात आकाशात पसरतो. म्हणून आकाश अनेकदा निळे भासते. असा महत्वपूर्ण शोध त्यांनी लावला. रामण यांनी प्रकाशाच्या विकिरणासंदर्भात जसे संशोधन केले, तसे भारतीय वाद्यांवरही केले होते.
भारतात टाटा यांनी सुरू केलेल्या भारतीय विज्ञान संस्थेचे रामन निर्देशक झाले. या पदावर काम करणारे ते पहिले भारतीय होते. या संस्थेला उच्च मान मिळवून देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. अनेक विदेशी वैज्ञानिकांना भारतात बोलावून भारतातील वैज्ञानिकांना प्रोत्सहित केले. भारतात विज्ञान विकास व वैज्ञानिक दृष्टीकोन जागविण्यास डॉ.रामण यांचे संशोधन व प्रेरणा सदैव स्मरणात राहील. त्यांच्यामुळेच भारताला विक्रम साराभाई, होमी जाहांगीर भाभा, के.आर.रामनाथन यांच्यासारखे महान वैज्ञानिक लाभले. अशा या थोर भारतमातेच्या सुपुत्राचे 21 नोव्हेंबर 1970 रोजी निधन झाले.

ज्या दिवशी डॉ. सी.व्ही.रामन यांनी रामन इफेक्ट चा शोध लावला त्या 28 फेब्रुवारी या दिवशी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

प्रकाशन सहाय्य : प्राजक्ता पेडणेकर. (मसुरे प्रतिनिधी)
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.
   

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स