नाडकर्णी नगर महिला मंडळाची 'कृतज्ञतेची परंपरा' कायम..!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील नाडकर्णी नगर येथील महिला दरवर्षी हळदी कुंकू घराघरांमध्ये न करता सामायिकरीत्या करतात आणि घरातील हळदी कुंकवाचे पैसे कृतज्ञता निधी मध्ये जमा करतात .या निधीतून दरवर्षी गरजू व्यक्ती किंवा संस्थांना हे पैसे कृतज्ञता निधी म्हणून दिले जातात . यंदा सुद्धा नाडकर्णी नगर महिला मंडळाने आपली कृतज्ञतेची परंपरा कायम ठेवली . कोरोनामुळे अनेक लहान मुलांनी आपले आई अथवा वडिल अथवा दोन्ही पालक गमावले आहेत . कलमठ गावातील अशा पालक गमावलेल्या निवडक गरजू मुलांना या कृतज्ञता या निधीतून मदत देण्यात आली . नाडकर्णी नगर मधील माघी गणेश जयंती उत्सव कार्यक्रमात या निधीचे वाटप करण्यात आले .यश महेंद्र जाधव , जयेश बाळा हिंदळेकर,राहुल कडुलकर,संतोष राणे,
अर्शील जमालूद्दीन खान या मुलांना हा मदत निधी देण्यात आला .
परंपरागत लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य काही संस्था आपल्या जिल्ह्यामध्ये करत आहेत . जिल्ह्यातील कुडाळ येथील पिंगुळी येथील “दायती लोककला संवर्धन अकादमी” या संस्थेला सुद्धा यंदा कृतज्ञता निधी प्रदान करण्यात आला . राष्ट्रपती पदक विजेते गणपत मसगे , त्यांचे पुत्र शिवदास मसगे , कृष्णा मसगे आणि त्यांचे कुटुंबीय ह्या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी कला जिवंत ठेवणे आणि कलोपासक नवीन पिढी घडविणे हे कार्य करत आहेत . यासाठी त्यांनी पिंगुळी येथे ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम आणि संग्रहालय उभारले आहे . कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी आदी कलांचे समग्र दर्शन घडवणारे हे दालन आहे . लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित एक कार्यक्रम ते कळसूत्री बाहुल्या , चित्रकथीच्या माध्यमातून लोकांसमोर आणणार आहेत . त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी हा निधी दायती संस्थेला सुद्धा देण्यात आला . यावेळी लोककलाकार गणपत मसगे यांची प्रकट मुलाखत पत्रकार विजय गांवकर यांनी घेतली . यानंतर कळसूत्री बाहुल्यांची ओळख करून देणारा गणपती नमनाचा कार्यक्रम गणपत मसगे आणि मंडळींनी सादर केला . कार्यक्रमादरम्यान नाडकर्णी नगर येथील रहिवासी सौ प्रज्ञा ढवण यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालिका पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्थानिक मुलांनी विविध कार्यक्रम सादर केले . यावेळी महिला मंडळाच्या उज्वला धानजी , विद्या घाणेकर , पूजा जाधव , भक्ती गांवकर , मृदुला घळसासी , आरती वायंगणकर , वैष्णवी धानजी ,साक्षी माळवदे, वर्षा मोहिते ,अपर्णा केरकर , सुनंदा ठाकूरदेसाई , लक्ष्मीछाया देसाई, विशाखा पेडणेकर,शोभा वायंगणकर , कृतिका चव्हाण , दीपिका चव्हाण , वंदना रासम , शिल्पा मालंडकर , शीतल सावंत ,सुप्रिया महाजन , शीला सावंत उत्कर्षा धुमाळे आदी महिला उपस्थित होत्या .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)