विकासासाठी कटिबद्ध असल्याची नौटंकी विरोधकांनी आतातरी थांबवावी..!
कांदळगाव उपसरपंच आनंद आयकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे कडाडले….!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि त्यावरून दररोज सर्व सामान्य ग्रामस्थ स्थानिक आमदार यांना लक्ष करत आहेत. याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी विकास करण्यासाठी ठाकरे सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले होते. या वक्तव्यावर पलटवार करत विकासासाठी कटीबद्धता होती तर मागील सात वर्षे जाहीर केलेले कांदळगाव ते मसुरे रस्त्याचे काम अद्याप का रखडले आहे असा सवाल कांदळगाव उपसरपंच आनंद आयकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
काही वर्षांपूर्वी शरीरसौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी रामेश्वर मंदिर परिसरात जाहीर सभेत उद्या पासून रस्त्याचे काम सुरू होणार असे सांगितले होते. त्याला आता साडे सात वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु ग्रामस्थांच्या पदरी अद्यापही खड्यातून प्रवास चुकलेला नाही आहे. कांदळगाववासियांना आ. नाईक यांनी साडेसाती भोगायला लावली असे खेदाने सांगावेसे वाटते. पाच वर्षांपूर्वी २५/१५ मध्ये पाच लाख रुपये मंजूर रस्ता कुडाळ तालुक्यातील पावशी येथे पळवला ही वस्तुस्थिती आहे. हरी खोबरेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडून याबाबत माहिती घेतल्यास “कटिबद्ध ” या शब्दाचा नेमका अर्थ त्यांना समजेल. आमची खोबरेकर यांना विनंती आहे की त्यांनी सद्य स्थितीत सतत आठ दिवस दुचाकी वरून कांदळगाव मसुरे रस्त्याने प्रवास करून दाखवावा म्हणजे नौटंकी कळेल. जनतेचा पैसा, कर यातून सुसज्ज रस्ते, पाणी, विज, आरोग्य यावर खर्च करून सुविधा देणे हे कर्तव्यच आहे. स्वखर्चाने पाच वर्षांपूर्वी रस्ता खडीकरण डांबरीकरण केला असता तर नक्कीच सर्वांनी कौतुक केले असते. या रस्त्यावरून चालणाऱ्या दुचाकी तीनचाकी आणि चारचाकी वाहने खिळखिळी झाली आहेत. प्रवास करणाऱ्या लोकांना मानेचा पाठीचा मणक्यात गॅप पडलेत या सर्व गोष्टी पुर्ववत करून देण्यासाठी कटिबद्ध व्हा! या रस्त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातुन विकासकामांमध्ये राजकारण बाजूला ठेवून विविध लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातुन पाठपुरावा केला होता. प्रसंगी ग्रामस्थ रस्त्यावर आंदोलनासाठी उतरले. कितीतरी अपघात या रस्त्यावर झाले या सर्वांची माफी मागा! या रस्त्यासाठी बोलणे म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे असे वाटते. त्यामुळे आठ दिवस मसुरे येथे कांदळगाव मार्गे दुचाकी वरून आवर्जून प्रवास करावा आणि खड्ड्यांमधून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांच्या वेदना समजून घेण्यासाठी कटिबद्ध व्हावे असे आवाहन उपसरपंच आनंद आयकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)