हळवलच्या तिटाई महिलामंडळाची समाजप्रेरक धिटाई.....!
कणकवली | उमेश परब | ( विशेष वृत्त ) : ” एखादी गोष्ट जेंव्हा ठरवते बाई…तेंव्हा तिला अशक्य काहीच नाही…..!” अशा आशयाच्या ओळी शब्दांत तर आपण सगळेच जाणतो आणि त्याचीच सामाजिक प्रचिती हळवल येथील तिटाई महिला मंडळाच्या प्रत्येक बाईने दिली आहे. कणकवली तालुक्यातील तिटाई महिला मंडळ हळवल यांच्या वतिने वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. पावसाळा संपल्यानंतर ग्रामीण भागात पाणी तुडवडा काही प्रमाणात होत असतो यामुळेच असे उपक्रम घेणे गरजेचे असल्याने हळवल येथील तिटाई महिला मंडळाच्या वतीने हळवल परबवादी येथील नाल्यात हा वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.
या वनराई बंधाऱ्यामुळे गावातील गुरांना काही काळ मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. तिटाई महिला मंडळाने स्वखर्चाने बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची पाहणी केल्यानंतर हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया हळवल ग्रामस्थांनी दिली आहे. १ मे २०२० रोजी स्थापना झालेल्या तिटाई महिला मंडळ हळवल यांच्या वतीने अनेक सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत. हा वनराई बंधारा बांधतेवेळी अध्यक्ष गायत्री गावडे, सान्वी गावडे, सहखजिनदार दर्शना परब, मंगल गावडे, प्रीती गावडे, तेजश्री परब, सविता गावडे, वंदना गावडे, रोहिणी परब, अंकिता परब, संजना धुरी, अर्चना परब, मयुरी पाडावे, स्नेहा गावडे, रुपाली राणे, दिव्या परब, वनिता परब, प्राची मडव, विजया परब, राजश्री परब, सुवर्णा परब सोनल गावडे आदी सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्रातील व खासकरुन कोकणातील स्त्रिया ह्या परंपरागत अशी शेतीची, घरबांधणीची,गडगे व कुंपण उभारणीचीही कामे अगदी काटकपणे करत आलेल्या आहेतच. ज्याप्रमाणे आज विविध कार्यालये,ऑफिसेस व आस्थापने यांच्यात कार्यरत रहात आजची स्त्री समाज सशक्त करण्याचा प्रसार करत आघाडीवर आहे त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक किंवा पाणी अडवून जिरवायचीही इच्छाशक्ती दाखवून महिला किती कल्पक व सशक्त आहे हेच तिटाई महिलामंडळाच्या प्रत्येक स्त्रीरुपी ‘विठाई ने दाखवून दिले आहे असेच म्हणता येईल. सर्व क्षेत्रात काम करणार्या स्त्रियांची समाजसात्विक आघाडीवर राहून कार्यरत रहायची इच्छा नक्कीच सर्वंकष विकासाचा एक प्रमुख धागा आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)