मालवण नेरुरपार कुडाळ रस्त्यावर "अपरिचितचा अंबी...!"
दाक्षिणात्य सिनेमा अपरिचीतची विडंबनात्मक झलक…..!
चौके | अमोल गोसावी | विशेष वृत्त : एक बहुचर्चित दाक्षिणात्य सिनेमा आहे ‘अपरिचित..!’ या अपरिचित सिनेमात जिथे जिथे अन्याय व भ्रष्टाचार होतो तिथे तिथे एक अपरिचित व्यक्ती ‘अंबी ऊर्फ रेमो’,आधी संबंधीत खात्याला, अधिकाऱ्याला किंवा कर्मचार्याला समजावणीच्या लेखी व जाहीर सूचना देते. नंतर ती कामे सुरळीत होऊन समाजातील इतर व्यवस्थाही भ्रष्टाचारमुक्त व कार्यतत्पर बनते अशी कथा आहे. अगदी जशासतशी नाही परंतु काहीसा असाच समाजातील समस्यांकडे लक्ष वेधायचा प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नेरुरपार कुडाळ मार्गावर सध्या कोणीतरी अपरिचित करताना दिसत आहे.
मालवण चौके नेरुरपार कुडाळ या रस्त्यावर ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याठिकाणी रस्त्याकडेला आज सोमवार दिनांक ८ नोव्हेंबरच्या सकाळपासून रस्त्यांच्या दुरवस्थेवर विडंबनात्मक भाष्य करणाऱ्या मजकुराचे बॅनर दिसत. रविवारी रात्री उशीरा अज्ञातांनी सदरचे बॅनर लावले असावे अशी शक्यता आहे. एकूणच ठिकठिकाणी झळकलेले सदर बॅनर मात्र रस्त्यावरून येणारे जाणारे प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यासाठी चर्चेचा विषय ठरत आहेत.
धामापूर ते कुडाळ दरम्यान काळसे परबवाडी येथील रस्त्याकडेला तसेच नेरुर परिसरात वसुंधरा विज्ञान केंद्र, जोशी टेंब यादरम्यानच्या रस्तावरील खड्ड्यांनजीक बॅनर लावण्यात आले आहेत.
“शिवी न घालता मालवण – कुडाळ प्रवास करा आणि मिळवा बंपर ऑफर ” , ” तुम्हाला निवडून देउनी आम्ही हात जोडीले ह्या रस्त्यावरुन प्रवास करताना खड्ड्यात आमचे कंबरडे मोडीले ” , मालवण नेरुरपार कुडाळ रस्त्याने खड्ड्यातून जावू… पुन्हा तुम्हाला निवडणून देऊ ” , ” पहिलं वैभव कणकवलीत होतं आता तेच वैभव खड्डयाच्या रुपाने मालवण कुडाळ रस्त्यावर दिसतेय., ” अशाप्रकारच्या मजकुराचे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. येत्या वीस नोव्हेंबररोजी येथील ग्रामस्थही खड्ड्यांच्या प्रश्नांबाबत आंदोलन करणार आहेत . आता त्या आंदोलनापूर्वीच एका “अपरिचीत अंबी ऊर्फ रेमो” या व्यक्तिने त्याच्यापरीने हा प्रयत्न केल्याची चर्चा मार्गावरील ग्रामस्थांकडून आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)