एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात.
मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुकळवाड येथील जयवंती बाबू फाऊंडेशन संचालित एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. युवकांना कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून देत त्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रेरित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सिंधुदुर्ग विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. भैय्याजी येरमे आणि एम.आय.टी.एम. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी श्री. अमित तडवी, श्री. सुरज देबाजे, श्री. नामदेव सावंत, तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. रविंद्र पत्की आणि अप्रेंटिसशिप ॲडव्हायझर सिंधुदुर्गचे श्री. उमेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. एम.आय.टी.एम. संस्थेचे विश्वस्त श्री. विनोद कदम, सौ. वृषाली कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अशोक सावंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, डिप्लोमा प्राचार्य श्री. विशाल कुरो, उपप्राचार्या सौ. पूनम कदम आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी माननीय श्री. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. रविंद्र पत्की देखील उपस्थित होते. त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी श्री. सुरज देबाजे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच संस्थेचे विश्वस्त श्री. विनोद कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एम.आय.टी.एम. महाविद्यालयाच्या ऐश्वर्या पालव आणि दर्पण गावडे या विद्यार्थ्यांनी जागतिक युवा कौशल्य कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी या कार्यक्रमातून मिळालेल्या प्रेरणा आणि ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि एम.आय.टी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांनी विद्यार्थ्यांना जागतिक युवा दिनाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी श्री. अमित तडवी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे विश्वस्त श्री. संतोष पाल, सौ. नेहा पाल आणि संचालक श्री. केतन कदम यांनी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)