लायन्स क्लब मालवण नूतन कार्यकारी मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात.
लायन्स क्लब सदस्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
मालवण | ब्यूरो न्यूज : लायन्स क्लब ही संस्था आपल्या कार्यातून समाजासाठी सेवा व मदत करत असते. लायन्स सदस्यांनी सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहावे, प्रतिपादन लायन्स क्लबचे M.J.F. व माजी मल्टीपल कौन्सिल चेअरमन ला. द्वारका जालान यांनी बोलताना केले.
लायन्स क्लब मालवणच्या सन २०२५ – २६ या वर्षासाठी गठीत केलेल्या नवीन कार्यकारी मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा दैवज्ञ भवन मालवण येथे मुख्य अतिथी द्वारका जालान यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तत्पूर्वी मावळते अध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी यांनी त्यांच्या व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये लायन्स क्लबसाठी दान केलेल्या जागेत निर्माण केलेल्या लायन्स क्लब सेवा संकुलाचे उदघाटन द्वारका जालान यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात व्यासपीठावर द्वारका जालान, क्लबच्या नूतन अध्यक्षा सौ. अनुष्का चव्हाण, सचिव सौ. मनाली दळवी व खजिनदार सौ. पूनम चव्हाण, माजी अध्यक्ष महेश अंधारी, माजी सचिव सौ. फॅनी फर्नांडीस, माजी खजिनदार सौ. पल्लवी खानोलकर आदी उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष अनुष्का चव्हाण यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देऊन द्वारका जालान यांच्या हस्ते पदभार सुपूर्द करण्यात करण्यात आला.
माजी अध्यक्ष महेश अंधारी यांनी गतवर्षीच्या कार्याचा आढावा घेतला. तर फॅनी फर्नांडिस यांनी वर्षभरातील कार्य अहवाल वाचन केले. पल्लवी खानोलकर यांनी शंभर टक्के सदस्य फी जमा झाल्याने मालवण लायन्स क्लबला दोन पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगितले. तर अनुष्का चव्हाण यांनी यावर्षी आपण लायन्स क्लबचे विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून निर्धाराने व सर्वांच्या सहकार्याने वर्षभरात विविध उपक्रम राबविणार, सांगितले. तर मनाली दळवी व पूनम चव्हाण यांनीही मनोगते व्यक्त करत वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. तर श्री. जालान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी लायन्स क्लबच्या सदस्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महेश अंधारी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सौ. स्नेहा जामसंडेकर व उदय घाटवळ यांनी केले. आभार मनाली दळवी यांनी मानले. यावेळी मालवण लायन्स क्लब तसेच जिल्ह्यातील इतर लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)