चिंदर ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्री देव रामेश्वर ग्रामविकास आघाडीचे महेंद्र मांजरेकर विजयी.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या चिंदर ग्रामपंचायतच्या अवघ्या ६ महिन्यांच्या उर्वरित कालावधीसाठी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत श्री देव रामेश्वर ग्रामविकास आघाडी चिंदरचे महेंद्र मधुकर मांजरेकर हे ६ विरुद्ध २ मतांनी विजयी झाले आहेत. तर विरोधी उमेदवार शशिकांत नाटेकर यांना पराभव स्वीकारावा लागला. उपसरपंच दीपक सुर्वे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्याजागी महेंद्र मांजरेकर यांची निवड झाली.
सरपंच नम्रता गावकर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. उपसरपंच पदासाठी महेंद्र मांजरेकर यांच्यासह शशिकांत नाटेकर, केदार परुळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र, निवडणुकीपूर्वी केदार परुळेकर यांनी अर्ज मागे घेतला. गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायतच्या ९ सदस्यांनी त्यासाठी मतदान केले. महेंद्र मांजरेकर यांना ६ मते तर शशिकांत नाटेकर यांना २ मते पडली. तर एक मत बाद झाले. महेंद्र मांजरेकर हे राष्ट्रीय काँग्रेस चे पदाधिकारी असून २०२१ मध्ये झालेल्या चिंदर ग्रा. पं. निवडणुकीत त्यांनी ६ विरुद्ध ५ बलाबल असताना महाविकास आघाडी ऐवजी पक्षविरहित श्री देव रामेश्वर आघाडी चिंदरला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यामुळे सहा महिन्यांसाठी त्यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली आहे. याबद्दल त्यांनी धोंडू चिंदरकर यांच्यासह संतोष गावकर, महेश मांजरेकर व अन्य पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
श्री देव रामेश्वर आघाडी चिंदर म्हणून आम्ही पाच वर्षापूर्वी निवडणूक लढवली. त्यानंतर सरपंच, उपसरपंच यांना नेहमीच माझा पाठिंबा राहिला. गाव विकास हेच आमचे स्वप्न राहिले. उर्वरित सहा महिन्यातही गावाच्या विकासासाठी आमचे प्रयत्न राहतील, उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)