विजय कामत यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव.
मालवण एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह.
मालवण | ब्यूरो न्यूज : कुडाळदेशकर गौडब्राह्मण सहयोग, डोंबिवली यांच्यातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ परुळेकर स्मृती आणि मुख्याध्यापक बाबुराव परुळेकर स्मृती शैक्षणिक कार्य पुरस्कार २०२५ मालवण एज्युकेशन सोसायटी, मालवणचे कार्यवाह विजय प्रभाकर कामत यांना प्रदान करून गौरवण्यात आले. मालवण एज्युकेशन सोसायटी आणि परिवारातर्फे या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात अभिनंदन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांनी विजय कामत यांच्या कार्याचा आढावा घेतला. मालवण एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार दिगंबर सामंत यांनी मालवण एज्युकेशन सोसायटीच्या समृद्ध इतिहासाला उजाळा दिला.
या सोहळ्यात मालवण एज्युकेशन सोसायटी आणि परिवारातर्फे विजय कामत यांचा शाल – श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. सुनीता कामत यांचाही साडी – ओटी भरून सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक श्री. वळंजू यांनी कामत यांना ‘कार्याग्रणी सन्मानपत्र’ प्रदान करून त्यांचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती तोरसकर यांनी केले तर सन्मानपत्राचे वाचन हायस्कूलचे शिक्षक चंद्रशेखर बर्वे यांनी केले. पर्यवेक्षक देविदास वेरलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मालवण एज्युकेशन सोसायटीच्या घुर्ये प्रि-प्रायमरी स्कूल, जयगणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा, अ.शि. देसाई हायस्कूल, ना.अ. देसाई ज्युनियर कॉलेज आणि काळे आजींची बालवाडी अशा सर्व विभागांचे शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि इतर स्टाफ उपस्थित होता. याशिवाय, मालवण एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष शैलेश खांडाळेकर, सदस्य लक्ष्मीकांत खोबरेकर, हायस्कूलचे माजी विद्यार्थी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)