ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्ह्यातील भजनी कलाकारांचा मेळावा.

जिल्ह्यातील भजनी कलाकारांचा मेळावा.

प्रकाशन: 16 Jun 2025 03:19 PM
वाचन संख्या 154

भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे आणि राजा सामंत, भालचंद्र केळुसकर, विजय परब यांची मार्गदर्शनर उपस्थिती.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अनेक गुणवंत भजनी कलाकार आहेत. त्यांना अनेक समस्यांना वेळोवेळी सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या सहकार्याने भजनी कलाकारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात येतील. तसेच भजन कलेला शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून आपण प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन ‘भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग’ चे अध्यक्ष भजन सम्राट संतोष कानडे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांचा मेळावा शनिवारी कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भजनी कलाकार उपस्थित होते. जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या ‘भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग’या संस्थेचा हा पहिला भव्य मेळावा आणि सर्वसाधारण सभा होती. नव्याने स्थापन झालेल्या संस्थेची ध्येय-धोरणे ठरविणे तसेच घटना निश्चित करणे आणि सर्वानुमते घटनेला मान्यता देणे तसेच भजनीबुवांच्या विविध समस्यावर चर्चा करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याच्या प्रारंभी ‘गुरु र्ब्रह्मा, गुरु र्विष्णू’ आणि ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच आमुची प्रार्थना’ या दोन प्रार्थना गीतांच्या गायनाने भजनी बुवांच्या या मेळाव्याला सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी उपस्थितांना घटना वाचून दाखवली.त्यानंतर सर्वांनी एकमताने त्या घटनेला मान्यता दिली. तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहिलेल्या विविध भजनी कलाकारांनी अनेक विषय मांडत भजनी कलाकारांच्या हितासाठी संस्थेची पुढील वाटचाल कशी असावी यावर आपली मते मांडली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भजनसम्राट प्रकाश पारकर म्हणाले, सर्व भजनी कलाकारांना सोबत घेऊन आम्ही ही भजन संस्था चालविणार आहोत. भजनी कलाकारांकडून सादरीकरण करत असताना कधी तरी चुका झाल्या तरी तेही आपल्याच परिवारातील असल्यामुळे त्यांना समजून घेऊन ,वेळप्रसंगी योग्य ते मार्गदर्शन करून भजनी कलाकारांच्या हितासाठी कार्य करू. आवश्यकता भासेल त्यावेळी त्यांच्या निश्चितपणे पाठीशी उभे राहू. असेही त्यांनी सांगितले.

या मेळाव्या प्रसंगी जिल्ह्यातील प्रसिद्ध समालोचक राजा सामंत तसेच प्रसिद्ध भजन सम्राट, सिंधुरत्न भालचंद्र केळुसकर बुवा, भजन सम्राट विजय परब बुवा आणि अन्य भजनी कलाकारांनी मनोगत व्यक्त करत संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भजनी कलाकारांच्या विविध समस्यांवर व सूचनांवर चर्चा झाल्यानंतर संस्थाध्यक्ष संतोष कानडे बुवा, गोपी लाड बुवा व इतर सर्व पदाधिकारी यांचे उपस्थित भजनी कलाकारांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. प्रा.वैभव खानोलकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.

सौजन्य | कणकवली ब्यूरो.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स