कोमसाप सावंतवाडीची नूतन कार्यकारिणी निवड.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीच्या अध्यक्षपदी दीपक पटेकर, सचिवपदी राजू तावडे तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, कोषाध्यक्ष डॉ. दीपक तुपकर व सहसचिव विनायक गांवस यांची बुधवार, ११ जून रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे निवडणूक निरीक्षक तथा कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत २०२५ ते २०२८ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ॲड. नकुल पार्सेकर, भरत गावडे, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक-जोशी, मेघना राऊळ, प्रतिभा चव्हाण, विठ्ठल कदम यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसगे यांनी निवड झालेल्या सर्व कार्यकारणीचे अभिनंदन केले. तसेच नूतन कार्यकारिणीने साहित्य चळवळ जोमाने पुढे न्यावी आणि जबाबदारीने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना अभिप्रेत कार्य करावे असे आवाहन केले. गेली तीन वर्षे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत व कार्यकारिणीने उत्तमरित्या काम केले व जिल्हा साहित्य संमेलनासह विविध साहित्यिक कार्यक्रम राबविले यासाठी मावळत्या कार्यकारिणीच्या अभिनंदनाचा ठराव त्यांनी मांडला.
सभेच्या सुरुवातीला पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद, ज्येष्ठ साहित्यिक तथा वैज्ञानिक जयंत नारळीकर तसेच कोमसाप परिवारातील सदस्यांचे निधन झालेल्या नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रतिभा चव्हाण यांनी मागील वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. डॉ. दीपक तुपकर यांनी नफा-तोटा अंदाजपत्रक सादर केले. ॲड. सावंत यांनी आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर केला.
यावेळी व्यासपीठावर कोमसाप केंद्रीय सदस्या उषा परब, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, माजी तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदी उपस्थित होते. सौ. उषा परब, प्रा. सुभाष गोवेकर, ॲड. नकुल पार्सेकर, ॲड. प्रा. गणपत शिरोडकर, विनायक गांवस यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटेकर म्हणाले, सर्वांनी आपल्यावर विश्वास टाकून संधी दिली याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. साहित्यिकांची भूमी असलेल्या या कोकणात साहित्यिक चळवळ कशी पुढे जाईल यावर माझा भर असेल. कोमसापचे सुरु असलेले कार्य अधिक जोमाने पुढे घेऊन जाण्यास मधु भाईंना अपेक्षित कार्य शाखेच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी.ए. बुवा, एस.एन. मुकन्नावर, प्रा. गणपत शिरोडकर, अभय नेवगी, दिनानाथ नाईक, प्रा. रुपेश पाटील, दत्ताराम सडेकर, वाय. पी. नाईक, मृणालिनी कशाळीकर, सुहासिनी सडेकर, डॉ. सोनल लेले, किशोर वालावलकर, संजीव मोहीते, प्रा. डॉ. गणेश मर्गज, एकनाथ कांबळे, रामदास पारकर, संतोष पवार, राऊळ आदी उपस्थित होते. आभार प्रतिभा चव्हाण यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)