सिंधुदुर्ग सुपुत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व.
वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द.
पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान.
मुंबई | ब्यूरो न्यूज : डोंबिवलीहून लोकलने आणि त्यानंतर बसने प्रवास करत मंत्रालयात दाखल झालेल्या एका नागरिकाने आपल्या जीवनभराच्या मेहनतीची कमाई समाजासाठी समर्पित केली. सदानंद विष्णू करंदीकर (वय ८२), हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील रहिवासी असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रत्येकी १० लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले.
करंदीकर हे खासगी कंपनीतून निवृत्त झाले असून त्यांच्या पत्नी सुमती करंदीकर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. हे दोघेही अपत्य नसल्याने नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात रहात असत. गतवर्षी ऑगस्टमध्ये करंदीकर यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. नातेवाईकांची धावपळ आणि पैशांसाठी करावी लागणारी धडपड सदानंद करंदीकर यांनी जवळून पाहिली. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या स्मरणार्थ आपल्या कमाईतील मोठा भाग समाजालाच परत करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच अध्यात्मात आणि शेतीत रस असलेले सदानंद करंदीकर यांनी मंत्रालयाकडे धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख आणि पंतप्रधान सहायता निधीला १० लाख असा एकूण २० लाख रुपयांच्या निधीचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.
सध्या करंदीकर हे त्यांच्या भगिनी प्रभा श्रीराम शितूत यांच्याकडे वास्तव्यास आहेत. वृध्दाश्रम, कुटुंबियांची धावपळ यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या सिंधुदुर्ग सुपुत्र करंदीकर यांनी सागरा प्रमाणेच समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठीचे आपले दातृत्वही अमर्याद असल्याचे सिद्ध केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)