दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त सभा.
पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व मान्यवर आणि पत्रकार उपस्थित.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन सभा संपन्न झाली. यावेळी संबोधीत करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, पत्रकार समाजाचा आरसा आहे. महाराष्ट्र राज्याला विकासाच्या योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात योग्य संवाद, तुम्हा सर्व पत्रकारांची सकारात्मक साथ निर्माण करून चालणे ही आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. तसेच सकारात्मक काम महाराष्ट्रात होईल असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. अनेक लोकप्रतिनिधी हे पत्रकारांच्या योगदानामुळेच घडलेले आहेत. समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचा फार मोठा वाटा आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, माजी अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, शरद काटकर, मन्सूर शेख, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे म्हणले, अखिल भारतीय पत्रकार परिषदेने ज्या ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊन सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आलात. तसेच पुन्हा पुन्हा येत जा. बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी असलेल्या पोंभुर्ले येथे वेगळ्या पद्धतीने विकासात्मक दृष्टी ठेवून काम करण्याचा मनोदय पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त करतानाच राज्यातून येणारा पत्रकाराला पोंभुर्ले येथे आल्यानंतर हेवा वाटला पाहिजे असे काम करू. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे ओरोस येथील पत्रकार भवन आधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज करण्याचा आपला प्रयत्न आहे. असेही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. काळ बदलला तशी पत्रकारिता बदलत चालली, जुन्या पत्रकारांची पत्रकारिता आणि सध्याची पत्रकारिता यात फरक पडू लागला. कारण आताची गरज सुद्धा तशी आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले.
परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यानी पत्रकारांच्या अडचणी सविस्तरपणे मांडतानाच त्या सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची मागणी मंत्री राणे यांच्याकडे केली. तर जिल्हाधिकारी अनिल पाटील, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सिंधुदुर्ग पत्रकार जिल्हा संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, जिल्हा माहिती अधिकारी चिलवंत यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांनी तर सूत्रसंचालन गणेश जेठे यांनी केले.
आमदार निलेश राणे व दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा
मराठी पत्रकार परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर हे दूरध्वनीद्वारे सहभागी झाले होते. त्यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत करताना सांगितले की, ‘पत्रकारांना आवश्यक असणारे सहकार्य करण्यासाठी सरकार नेहमीच पुढे राहील. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे आमच्या जिल्ह्यातील होते, याचा आम्हाला अभिमान आहे.’ तर आमदार निलेश राणे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना सांगितले की, ‘देशाचे भविष्य हे पत्रकारितेवर अवलंबून आहे. आताची पत्रकारिता महत्त्वाच्या वळणावर आहे. अशा काळात आगामी काळात पत्रकारांनी देखील जबाबदारीने काम करताना वेळप्रसंगी आत्मपरीक्षण करण्याची ही गरज आहे.
परिषद कार्यकारणीची झाली बैठक
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारणीची बैठक यावेळी पार पडले. या बैठकीत परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. तर बैठकीमध्ये सह राज्य प्रसिद्धीप्रमुख भारत निगडे, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, पुणे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनीही बैठकीत विविध प्रश्न मांडले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)