पतन विभाग कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकारी धडकले…!
मालवण | ब्यूरो न्यूज | ता. ५ : शहरातील दांडी येथील श्रीकृष्ण मंदिर ते चौकचार मंदिर धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम हे येत्या चार दिवसात सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने पतन विभागाच्या अभियंत्यांना देण्यात आला.
शहरातील दांडी येथे महाविकास आघाडी सरकारच्या काळात श्रीकृष्ण मंदिर ते चौकचार मंदिर पर्यंत धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर करण्यात आला होता. माजी आमदार वैभव नाईक यांनी विशेष प्रयत्न करून यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु दोन वेळा महायुती सरकार स्थापन झाल्यापासून अद्यापही या बंधाऱ्याचे काम पूर्ण झालेले नाही हे या सरकारचे अपयश आहे असे स्पष्ट करत ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, जयदेव लोणे, हेमंत मोंडकर, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी येथील पतन कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
या बंदराच्या कामासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असतानाही प्रत्यक्षात या कामाला का सुरुवात झाली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर पतन अभियंता एस. एस. जाधव यांनी येत्या चार दिवसांत या कामाला सुरुवात होणार आहे असे स्पष्ट केले. तसेच देवबाग, तळाशील येथील बंधाऱ्यांच्या कामासाठी सीआरझेडची परवानगी अद्यापही मिळालेली नाही याबाबत नवीन मॅप प्राप्त झाले असून ते कमिटी समोर सादर केले जाणार आहे. यात मंजुरी मिळाल्यानंतर या दोन्ही गावातील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे असे स्पष्ट केले.
दांडी येथील बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांना पावसाळ्यात मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. तरी या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला द्याव्यात अन्यथा झालेल्या नुकसानीस आपल्याला जबाबदार धरण्यात येईल असेही यावेळी श्री खोबरेकर यांनी स्पष्ट केले. येत्या चार दिवसात या बंधाऱ्याच्या कामास सुरुवात न झाल्यास ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)