मालवणातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीची यात्रा उत्साहात.
संस्थापक श्री. भाऊ सामंत व संयोजक श्री. हिंदळेकर यांची कृतज्ञता.
यात्रेच्या पार्श्वभूमीवरील शालेय रंगभरण, चित्ररथ व वेशभूषा स्पर्धेसह विविध सादरीकरणांनी यात्रेला सांस्कृतिक रंगत.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात गेली २२ वर्षे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून काढण्यात येणारी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात संपन्न झाली. या यात्रेचे सफल आयोजन हे सर्वांच्या सहभागातील सांघिक यश आहे. प्रत्येकाला आपली वाटावी अशी ही स्वागत यात्रा ठरते असे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणचे संस्थापक श्री. भाऊ सामंत व संयोजक श्री. हिंदळेकर यांनी सांगितले.
या यात्रेत विविध चित्ररथ, वेशभूषा स्पर्धा, ढोल – झांज पथक, तुतारी यांसह कांदळगाव येथील महिला रोंबाट आणि चैतन्यदायी सांस्कृतिक कार्यक्रमांचा सहभाग होता. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला, पुरुष आणि वेशभूषातील बच्चेकंपनी हे सर्व स्वागत यात्रेचे केंद्र ठरले. यावर्षी कांदळगाव येथील महिला रोंबाट, आचरा स्वराज्य तथा यशराज प्रेरणा गृप पहिल्यांदा सहभागी झाले. त्यासोबत गुजराती समाजाच्या महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषांसह मोठ्या संख्येने स्वागत यात्रेत सहभागी झाले.
यावर्षी स्वागत यात्रा समितीच्या वतीने सणउत्सव या संकल्पनेवर आधारित शालेय रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेलाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. शहर परिसरातील शाळांमधून सुमारे दोन हजार विध्यार्थ्यांचा सहभाग स्पर्धेला लाभला. स्पर्धेला लाभलेला प्रतिसाद पाहता पुढील वर्षी अधिक मोठया प्रमाणात ही स्पर्धा तालुका सतरावर आयोजित करण्याचा मानस श्री. भाऊ सामंत, श्री. हिंदळेकर यांनी व्यक्त केला आहे.
शालेय आणि खुल्या अशा विविध गटात घेतल्या गेलेल्या वेशभुषा स्पर्धाही यावेळी लक्षवेधी ठरल्या. या स्पर्धानाही मोठा प्रतिसाद लाभला. दोनशे पेक्षा जास्त यात स्पर्धकांचा सहभाग होता.
दरवर्षी आकर्षक होत जाणारे यात्रेचे स्वरूप तसेच नागरिकांचा वाढता सहभाग पाहता ही स्वागत यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पटलावर महत्वपूर्ण अशी ठरत आहे. आगामी काळातही सर्वांच्या सहभागातून आणि सहकार्यातून यात्रा अधिकाधिक भव्य दिव्य करूया असेही भाऊ सामंत, हिंदळेकर यांनी सांगितले व मालवणवासियांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
सौजन्य : मालवण ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)