आ. निलेश राणेंच्या माध्यमातून कोळंब येथील धीरज कांदळगावकर यांची यशस्वी शस्त्रक्रिया.
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर धीरज कांदळगावकर व कुटुंबियांनी मानले आ. निलेश राणेंचे आभार.
मालवण | ब्यूरो न्यूज : एका गंभीर आजारामुळे कोळंब येथील धीरज कांदळगावकर यांना अपंगत्व आले. वैद्यकीय उपचारांचा खर्चही मोठा होता. परिस्थिती बेताची असलेल्या कांदळगावकर कुटुंबियांना आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या माध्यमातून मोलाचा आधार मिळाला आणि यशस्वी शस्त्रक्रिये नंतर धीरज पुन्हा दोन्ही पायांवर उभे राहिले.
मालवण तालुक्यातील कोळंब खालची वाडी येथील धीरज कांदळगावकर यांना एका आजारात डाव्या पायातील बॉलची झीज झाल्याने त्यांना अपंगत्व आले होते. जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यासाठी आधी त्यांना त्या आजारावर उपचार घेण्यास सांगितले. त्यानंतर पायाची शस्त्रक्रिया करता येईल असे सांगितले. त्यानंतर कांदळगावकर यांच्यावर उपचार सुरु झाले. २०२० पासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. तोपर्यंत धीरज हे कुबड्यांच्या आधारावर चालत होते. २०२४ ला ते आजारातून मुक्त झाले.
जानेवारी महिन्यात त्यांनी पायांवर शस्त्रक्रियेची तयारी सुरु केली. त्या काळात काही ग्रामस्थांनी थोडीफार आर्थिक मदत केली. त्यातून औषधोपचाराचा खर्च झाला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शासकीय योजनेतून कांदळगावकर यांचं मुंबईत जे जे रुग्णालयात ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी कांदळगावकर यांना चालण्यास सांगितले असता बसविलेला बॉल पुन्हा निसटला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुन्हा ऑपरेशन करावं लागणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यासाठी दीड लाख अतिरिक्त खर्च येणार असल्याचे सांगितले. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कांदळगावकर यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं. एवढी मोठी रक्कम कशी उभी राहणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. शस्त्रक्रियेसाठी पैसे भरण्यासाठी हॉस्पिटलकडून विचारणा होत होती. मात्र, कांदळगावकर यांच्याकडे काहीही उत्तर नव्हते. अखेर कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांना याबाबत माहिती समजताच त्यांनी तात्काळ हॉस्पिटलशी संपर्क साधून कांदळगावकर यांची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. त्यानुसार १० फेब्रुवारीला त्यांचे ऑपरेशन झाले. आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून कांदळगावकर यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यामुळे पाच वर्षानंतर कोळंब येथील धीरज कांदळगावकर हे पुन्हा एकदा दोन्ही पायावर चालू शकणार आहेत. आमदार निलेश राणे यांनी मदत केली नसती तर शस्त्रक्रिया झाली नसती असे सांगत धीरज कांदळगावर आणि कुटुंबियांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)