एस टी पास थेट तुमच्या शाळेत...!
विशेष योजनेचा लाभ सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी व्हावा म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याची मालवण आगार प्रमुख श्री सचिन बोवलेकर यांची माहिती.
मालवण | प्रतिनिधी : अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरीत करण्यात येणार अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला तसे सूचीत केले आहे. मालवण एस टी आगार प्रमुख श्री. सचेतन बोवलेकर यांनी, विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेवर कार्यवाही करणार व जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली आहे. नुकतेच एका व्हिडिओ काॅन्फरसींग द्वारे शालेय पास संदर्भात चर्चा व मार्गदर्शन सत्र संपन्न झाल्याचेही मालवण एस टी आगारप्रमुख बोवलेकर यांनी स्पष्ट केले आहे.
एसटीतून विद्यार्थ्यांना ६६% सवलत दिली जात असते. या पाससाठी केवळ ३३%भरुन पास काढता येत असतो. विद्यार्थिनींसाठी बारावी पर्यंत मोफत एसटी पास मिळत असतो. आता एसटीने थेट शाळेत पास वितरीत करण्याची योजना आखली आहे. राज्यात एसटी महामंडळाच्या सध्या १६,००० हजार बसेस असून ८७,००० कर्मचारी अहोरात्र सेवा देतात. एसटी महामंडळ अनेक समाज घटकांना सवलतीत प्रवास घडवित असते. या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम सरकार एसटी महामंडळाला परत करीत असते.
नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. आता एसटी महामंडळ त्यांच्या शाळा – महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देणार आहे. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात १८ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी – विद्यार्थिनींना होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)