ओवळीयेत घराला आग ; कष्ट करून शेतीवर अवलंबून असलेल्या आंगणे परिवाराचे लाखोचे नुकसान..!
मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ओवळीये येथील श्री. नंदकुमार आंगणे यांच्या घराला काल १५जानेवारीला मध्यरात्री भयानक आग लागली. आंगणे परिवार त्यावेळी झोपेत असल्याने बेसावध होते. जागे होताच त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या आणि लगतचे गांवकरी मदतीसाठी धावले. या नंतर मिळेल त्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात आला तरिही आग शमत नव्हती. जोपर्यंत आग आटोक्यात आली तोपर्यंत घर व घरातील साहित्य जळून खाक झाले. घराला आग लागल्याचे कळताच नंदकुमार आंगणे हे आई, पत्नी व मुलगा यांसह प्रसंगवधान राखत घराबाहेर आले. घराला लागून असलेल्या गोठ्यात पाळीव गुरे ढोरे होती. त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र भडकलेल्या आगीत शेतकरी कुटुंबीय असलेल्या मनोहर आंगणे यांचे घर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
आग लागल्याची माहिती मिळताच माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आंगणे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)