महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला ; ठरल्या पहिल्या पोलिस महासंचालक..!
मुंबई | ब्यूरो न्यूज : महाविकास आघाडी मधील काही राजकीय नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. शुक्ला यांना मुंबई पोलीस आयुक्त करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार २९ डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घ्यायचा होता. अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.
रश्मी शुक्ला यांचे नांव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)