ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
तिकडे….!

तिकडे….!

प्रकाशन: 12 Jun 2025 01:34 PM
वाचन संख्या 225

विशेष अनुभव लेखन.

१९९५ ची वर्ष अखेर, सुहास शिरवळकर ऊर्फ सुशिंसोबत ती साजरी होत होती…! स्थळ अर्थात् पुणेच होतं. रात्री सुहासकाकांच्याच प्रशस्त बाल्कनीत गप्पा व खाऊची मैफिल रंगली होती. सुगंधाकाकू ( सुशिंच्या पत्नी), प्रबोध व सम्राटदादा ( सुशिंचे चिरंजीव) असा सुशी परीवार आणि मी , माझी आई व भाऊ असे सुशी परीवारातील वाढीव सदस्य इतके सात जण बाल्कनीत मस्त ‘घर’ करुन होतो.

बारा वाजून गेल्यावर काही मिनिटांतच नववर्षातली पहिली झोप डोळ्यासमोर आली. तरिही गप्पा सुरूच रहाव्यात असं वाटत होतं.

माझी झोप अनावर झालेली पाहून सुगंधा काकूने, “चला, आता झोपा. उद्या जायचंय ना तिकडे..!” असं आईकडे हसून पहात मला सांगितलं.
‘तिकडे’चा अर्थ आईने सरप्राईज सदराखाली अमूल्य करुन टाकला. दमणूक व बडबड धिंगाण्यामुळे खोदून काहीही विचारायचे त्राण नव्हते काही म्हणून सरळ झोपून दिलं….!


सकाळी रिक्षात बसून आईसोबत मी आणि दादा ‘तिकडे’ निघालो. आईचा आधी फोन झालाच होता तसा पण पलिकडे कोण हे सरप्राईज ती सांगत नव्हती. पुण्याच्या सुसंस्कारी बंधु गर्दीतून रिक्षा एका शांत व पूर्ण शांत एरीयातील घरासमोर थांबली. रिक्षातून उतरुन आम्ही एका घरासमोर गेलो. बेल वाजवली. तब्बल दहा मिनिटांनी दरवाजा किलकिला करुन आमचं नांव विचारलं गेलं व पुन्हा दरवाजा बंद.. !
तसा खूप अधीर होऊन मी आईला, “काय कटकट आहे…कोणाला भेटायचंय?” वगैरे काही बरळलो पण र्हस्वपणे…कारण दीर्घपणे बरळलं तर परत जाताना वडापाव तथा इतर चैनींना लांबूनच पहायची भीती होती. पण इतक्या वेळात नेमप्लेट वगैरे वाचायची हौस तथा अक्कल नव्हतीच…आणि तशी बुद्धीही झाली नव्हती.

पुन्हा दार उघडलं गेलं आणि आता ते पूर्ण उघडलं गेलं होतं.! “चला…या ,” म्हणत शांतपणे एक करारी आजी समोर आल्या होत्या. आई त्यांच्या पाया पडली नंतर आम्हीही पडलो. आजींनी मस्त यूरोपीअन टाईप फर्निचरचं, साधेपणाचंच दिवाणखानारुप मस्त जपलेलं होतं. टी पाॅयवर दोनचार वृत्तपत्रं होती. त्या आजी आणि आई हळू आवाजात काही बोलत होत्या. हलकेच सूचना दिल्यासारख्या हातवारेही करत होत्या.
मी आपला पेपरांत ,’दोड्डा गणेशची चमकदार कामगिरी,पन्नास धावांत तीन बळी..’, ही क्रिकेट बातमी वाचनात गुंग झालेलो होतो.

आतून एक काठी व व्हीलचेअरचा आवाज आला. त्या आजी कोणाला तरी घेऊन बाहेर आल्या. त्या व्यक्तीने मफलर पूर्ण गुंडाळलेला होता. हात थरथरते होते. चंदेरी पांढरे केस थकल्यासारखेच तरी मफलरबाहेर थोडे डोकावू पहात होते. आई धावत जाऊन त्या माणसाच्या पायाशीच बसली. पुढची वीस ते पंचवीस मिनिटं आई फक्त ढसाढसा रडत होती. माझा दादाही त्यांच्या पाठीला हात लावून उभा होता….!
मला काही कळतच नव्हतं. मी दोड्डा गणेशच्या बातमीसोबत आता त्या आजींनी दिलेली मॅन्गो बर्फी कशी आणि कधी गिळायची अशा विचारांत होतो….!
बराच वेळ आईचे अश्रू सुरु होतेच व त्या माणसाचे थरथरते हात, आईच्या डोक्यावरुन अथक फिरत होते. नंतर आईनं मलाही बोलावलं. मला थोडं अवघडल्यासारखं गंभीर झालं. जवळ गेल्यावर खुणेने आणखी जवळ बोलवत त्या माणसाने माझ्या डोक्यावरही हात फिरवला….मायेने..!

तेवढ्यात त्यांचा मफलर सुटून मांडीवर पडला आणि काळ्या काड्यांच्या चष्म्याआडचे जगातले सर्वात बोलके डोळे दिसले..!
हो….हे डोळे मी ओळखत होतो. ही चमक मी जाणत होतो. ह्या डोळ्यांनी पाहिलेली सगळी जगं व ह्या डोळ्यांना पडलेली सगळी काल्पनीक स्वप्नंही दिसलेलीच मला पूर्वी…..अहो मलाच काय…अख्ख्या जगाने पाहिलेली ती शब्दस्वप्नं! मी त्यांना ऐकत व पहात लहानाचा मोठा होत होतो. वाचनाची आवड नव्हती पण ती कसर ऑडिओ कॅसेटस् व चित्रपटातून पूर्ण झालेली होती. ह्या डोळ्याच्या माणसाचे शब्द त्याच्याच आवाजात ऐकल्याशिवाय आम्हाला टेपरेकाॅर्डरची श्रीमंती मिळायची नाही….!

तो माणुस आराध्य ‘पु.ल.’ होते!

मोजून एक तासाची भेट….त्यातील अर्धातास मूक पुल आणि अश्रू…! वीस मिनिटं पु. ल. हळूवार गप्पा आणि….त्या आजींची करारी माया ही पुल भेटीची स्मृती..!

पाय निघत नव्हता. पण ते खूप नाजुक स्थितीत होते. थोड्याच दिवसांत पुलंचं कसलंसं ऑपरेशनही होतं. तरिही त्या हिमालयाने आपली कुशी तासाभरासाठी खुशीने अंगण म्हणून दिली होती..!

त्या आजीपण एक वेगळा इतिहास होत्या हे वय वाढल्यावर कळत गेलं…..त्यांचं नांवही अवघा महाराष्ट्र जाणतो….’सुनिता देशपांडे पु.ल………!’

सुयोग पंडित ( पुलंचा वाचक).

१२ जून….पुलंचा स्मृतिदिन.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स