मनसेची आरटीओ कार्यालयावर आक्रमक धडक ; राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांचे नेतृत्व.
रस्ते आस्थापना सेलचे अमोल जंगले, मालवण माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, कुडाळ माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे तसेच अन्य मनसे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित.
कणकवली | गणेश चव्हाण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तथा मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल गुरुवारी दुपारी आरटीओ कार्यालयात धडक देत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मालवणचे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, बाबल गावडे, आशिष सुभेदार, राजेश टंगसाळी, दीपक गावडे, आबा चिपकर, अमोल जंगले, आपा मांजरेकर, रामा सावंत, विनायक गावडे, वैभव धुरी, दुलाजी चौकेकर यांसह अनेक आजी माजी पदाधिकारी तसेच मनसैनिक उपस्थित होते. गोरगरीब तसेच सामान्य जनतेकडून हेल्मेटच्या नावाखाली वाहतुकीच्या नियमभंगाच्या दंड वसुलीसाठी जेवढी कार्यतत्परता दाखवता तेवढी कर्नाटक पसिंगच्या गाड्यांकडून टिपीशिवाय चाललेल्या ओव्हरलोड वाहतूकीबाबत का दाखवत नाही असा संतप्त सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. दुचाकीची विक्री करताना शोरूमनी दोन हेल्मेट देणे बंधनकारक असताना त्याप्रमाणे पुरवठा न होता दिखाऊपणासाठी बंधपत्र सादर केले जाते यावर आरटीओंनी काय कारवाई केली, परिवहन विभागाच्या २०२३ च्या शासन परिपत्रकानुसार अपंगांसाठीच्या शासकीय सुविधा व टॅक्स सूट बाबत जनजागृती का केली जात नाही असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला. तर एजंटांशिवाय कार्यालयातील लायसन्स व पासिंगची कामे का होत नाहीत, थेट कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आरटीओ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अडवणूक का केली जाते असा प्रश्न प्रसाद गावडे यांनी उपस्थित करत ज्याप्रमाणे हेल्मेट सक्तीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावला गेला तसा आरटीओ कडील विविध सेवांसाठीचे दरपत्रक व सिटीझन चार्टर फलक लावण्याची मागणी केली.
रस्ते आस्थापना सेलचे अमोल जंगले यांनी आरटीओ कार्यालय परिसरात प्रात्यक्षिक चाचणीसाठी वापरण्यात आलेला ट्रॅकच आरटीओच्या नियमांना अनुसरून नसून ट्रॅकवरील खुणा अस्पष्ट झाल्याने ट्रायल देणाऱ्या नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत याकडे लक्ष वेधले. परप्रांतीय व्यावसायिकांची ओव्हरलोड वाहतूक, जिल्ह्यातून होणारी गुरांची वाहतूक,हायवे प्राधिकरणाची वाहतूक सेफ्टीबाबत असलेली अनास्था, सार्वजनिक बांधकाम विभाग अखत्यारीत रस्त्यांवर स्पीड ब्रेकर दरम्यान अत्यावश्यक असलेले फलक यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत फक्त जनतेच्या आंदोलनांनंतर आरटीओ प्रशांसनाला जागं येणार असेल तर परिवहन विभागाचे अधिकारी जनतेपेक्षा प्रशासकीय विभागांनाच नियम का शिकवत नाहीत याबाबत तीव्र आक्षेप घेतला. मनसेच्या सूचनांप्रमाणे तात्काळ कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारीं श्री. नंदकिशोर काळे यांनी दिली. येत्या महिन्यांत आवश्यक बदल न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)