ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चित्त थरारक चपळतेचा 'चित्ता'... क्रिकेटपटू रवी मालवणकर...!'

चित्त थरारक चपळतेचा 'चित्ता'... क्रिकेटपटू रवी मालवणकर...!'

प्रकाशन: 09 Jul 2023 07:44 AM
वाचन संख्या 1075

गडग्यावरुन क्रिकेट भाग : २

सुयोग पंडित | क्रिडा विशेष : क्रिकेट हा खेळ मुळात ‘साईड ऑन’ पद्धतीने खेळला जातो. एक यष्टीरक्षक फक्त फ्रंट ऑन खेळत असतो पण चेंडू टाकला जाताना व गेल्यानंतर मैदानावरील इतर १२ खेळाडू बहुतांश ‘साईड ऑन’ पवित्रा घेऊनच खेळत असतात. ( यष्टिरक्षकांमध्ये जॅक रसेल अपवाद होता जो साईड ऑन यष्टिरक्षक होता आणि फलंदाजीतील अपवाद होता शिवनारायण चंद्रपाॅल जो फ्रंट ऑन फलंदाजी करायचा..पण ते अपवाद..!) टेनीस, बॅडमिंटन, स्क्वाॅश सारखे खेळ फ्रंट ऑन म्हणजे आमने सामने खेळले जातात. साईड ऑन खेळताना खेळातील उत्तम कौशल्य आणि त्यानंतर धावण्याची चपळता अशा दोन्ही गोष्टी फार कमी जणांना जमत असतील. या दोन्ही क्रिया करुन जो क्रिकेटर कधीच दमत नाही त्याला आपण ‘चित्ता’ म्हणू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराच्या प्रवेशद्वारातल्या देऊळवाड्यात असा एक क्रिकेटचा चित्त थरारक चित्ता आहे…रवी मालवणकर. साल १९८७-८८ पासून अगदी आजतागायत जवळपास गेली ३५ वर्षे हा क्रिकेटचा चित्ता स्पर्धात्मक क्रिकेटचा क्रियाशील हिस्सा आहे.

नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला देऊळवाड्यातील श्री देवी भावई मंदिराच्या बाजुच्या व्हाळी शेजारील गडग्यावर एक काटक, गंभीर तरिही स्मित हास्य असलेला रवी दिसायचा. एकटाच…! कोणतीही मवालीगिरी नाही किंवा त्याच्या भोवती वायफळ माणसांचे कोंडाळे देखील नसायचे. हातात कधीतरी वर्तमान पत्र किंवा अगदी शांत संयमाने कसलातरी विचार करत असणार्या रवीच्या हातात नेहमी छोटे काळे घड्याळ असायचे. त्या गडग्याच्या मागेच त्याचे घर. अतिशय सामान्य व कष्टाची पार्श्वभूमी असलेला तो युवक संध्याकाळी ५ वाजले की एका वेगळ्या ऊर्जेने भरुन जायचा. देऊळवाड्यातील पाॅवर हाऊसच्या मागील मैदानावर ओव्हर आर्मचा सराव किंवा श्री.देव नारायण मंदिरच्या पटांगणात अंडर आर्मच्या सरावाला पोचल्यावर तो गडग्यावरचा शांत व निश्चल असणारा रवी चित्त्याच्या चपळाईने त्याचा खेळ सुरु करायचा ते खरेच संपूर्ण थरारक व अविश्वसनीय होते. त्या काळात देऊळवाड्यात ओव्हर आर्मचे २ मजबूत संघ आणि अंडर आर्मचे ५ ते ६ कोशल्यपूर्ण संघ तयार होतील असे व इतके जण क्रिकेटसाठी धडपड करायचे त्यातील रवी मालवणकर हे नांव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल.

रवी मालवणकर हा त्याच्या डावखुर्या शैलीदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. ‘गॅरी कर्स्टन’ पठडितील तो फलंदाज आहे. अतिशय मनमोहक स्टान्स, समयोचित पद लालित्य म्हणजे फुटवर्क, चेंडू तटवल्या नंतर क्षणार्धात धाव पूर्ण करणारा द बेस्ट रनर बिट्वीन द विकेटस्, सामन्यात कोणत्याही क्षणी त्याच्या फलंदाजीचा गिअर बदलून इनसाईड आऊट आणि पुलचे फटके मारुन सरळ बॅटने गोलंदाजीची कत्तल करणारा फलंदाज अशी रवीची ओळख. कव्हर पाॅईंटवरुन दोन्ही पाय हवेत असताना जयसूर्या, सुरेश रैना, शिखर धवन किंवा काॅलीन मुन्रो जसे फटके लगावतात त्याच शैलीत परंतु जास्त नजाकतीने रवीचे फटके असतात व असायचे. १९९०च्या दशकातले तत्कालीन आमिर सोहेल, सईद अन्वर, ब्रायन लारा यांच्याही फलंदाजीचा पगडा कदाचित् त्याच्यावर असेल असे म्हणावे तर तसे खरेच नव्हते. रवी कोणाची काॅपी करुन फलंदाजी करत नसे हे त्याला त्यावेळी पाहिलेले सांगतील. फक्त लांबीने इतरांपेक्षा थोडी मोठी बॅट ही त्याची आवड होती. लांबीने मोठी बॅट तशी सर्वांना हाताळायला जमतेच असे नाही पण रवी ती लीलया हाताळायचा. रवीचे क्षेत्ररक्षण ही त्याच्या चित्त्याच्या चपळाईची पावती होती. न थकणारे काटक पाय, जमिनीवर कमी पण जणू हवेतच वावरणारी त्याची सदैव चपळ पावलं, सुरक्षित व खात्रीलायक असे हातांचे पंजे, क्षेत्ररक्षणाची इनिंग सुरु होऊन संपेपर्यंत चेंडूवर करडी नजर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ‘पंचाच्या निर्णयाचा सन्मान’ ह्या गोष्टींनी रवीचे क्रिकेटींग व्यक्तीमत्व नटलेले होते व आहे. मैदाना बाहेर थोड्याशा तापटपणे किंवा त्याचा मुद्दा तो स्पष्टपणे मांडेल पण सीमारेषेच्या आत पंचांशी हुज्जत घालणारा तो खेळाडू नाही. युवा रवी सोबत त्यावेळी खेळत खेळत मोठे झालेल्या सर्व लहान मुलांमध्येही एक गुण रवी आपसुक शिकवून गेलाय तो गुण म्हणजे विनाकारण अपिल न करणे..! आजही जरी तंदुरुस्तीसाठीची ‘यो यो चाचणी’ घेतली तर अनेक युवकांना रवी मालवणकर खूप गुणांच्या फरकाने पराभूत करेल अशी त्याची नैसर्गिक ठेवण व क्षमता आहे. नंतरच्या काळात रवी मालवणकर केवळ देऊळवाड्याचा न रहाता विविध नावाजलेले संघ व मोठमोठ्या खेळाडुंचा सहकारी बनला. तरिही त्याने देऊळवाड्यातील क्रिकेटकडे दुर्लक्ष केले नाही.

मीतभाषी रवी हा नुसता क्रिकेट खेळायच्या भुकेचा नव्हता. स्पर्धात्मक क्रिकेटच्या स्पर्धांचे आयोजन, पंच , गुणलेखक म्हणून देखिल तो त्याच युवा वयात कार्यरत असायचा. रवीचे एक वैशिष्ट्य म्हणजे जर त्याच्या कडे वेळ असेल तर तो लहान मुलांच्या सामन्यांमध्येही गुणलेखन व पंचगिरी तितक्याच आनंदाने करायचा जितका आनंद तो प्रत्यक्षात खेळताना मिळवायचा. केबल व डिजिटल टिव्हीचाही तितकासा प्रसार नसताना केवळ दूरदर्शन वरील अतिशय खराब प्रसारण असलेले धुरकट सामने पाहून क्रिकेट जाणलेल्या, जगलेल्या, अभ्यासलेल्या आणि पसरवलेल्या पिढीचा रवी ब्रॅन्ड ॲम्बॅसेडर आहे. ‘क्रिकेटवर करीअर’ काळात रवीचा जन्म नाही झाला जर तो झाला असता तर कदाचित हा चित्ता सर्वांनी जलद आयपिएल मधल्या एखाद्या संघातून टिव्हीवरुन अनुभवला असता हे शंभर टक्के..! क्रिकेटसोबतच देऊळवाड्यातील सामाजिक व अध्यात्मिक सोहळ्यांमध्ये रवीचा वावर असतो. तिथेही त्याचे प्रसंगावधान, शैलीदारपणा आणि दुसर्याला न दुखावणारा स्वाभिमानी बाणा तो जपतो.

रवी मालवणकर ‘चित्त थरारक चपळतेचा चित्ता क्रिकेटपटू’ म्हणून कितीही चपळ व हवेत जलद जरी असला तरी ‘माणुस’ म्हणून तो प्रचंड स्थीर डोक्याचा आहे. आज त्याचा चिरंजीव साईवेद मालवणकर जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर लेदरबाॅलचा उदयोन्मुख चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो पण ती ओळखही त्या मुलाने निर्माण केली आहे …रवीने त्यासाठी कुठे विशेष वशिला लावला नाही. ठरवलं असतं तर ते त्याला शक्यही आहे परंतु तिथेच रवी मालवणकर या माणसातील ‘सच्चा देऊळवाडचा क्रिकेटर’ जो क्रिकेटची उपासना करतो ते संस्कार दिसून येतात.

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या ‘गडग्यावरुन क्रिकेट’ या मालिकेतील या भागातल्या चित्त्याला…अर्थात् मालवण देऊळवाडच्या रवी मालवणकर याच्या जीवनाकडे पाहून म्हणावेसे वाटते की ‘उसकी जरुरते कम है…इसिलिए इस चित्तेके ज़मीर मे दम है…!’

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल ( गडग्यावरुन क्रिकेट)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स