मानपानापलिकडचे 'हळवे गंगाजल'…हक्काचे निमंत्रक..! हास्यजत्रा स्वास्थ्यजत्रा ( भाग : ४ )
सिनेपट | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : ‘आगंतुका सारखे कुठल्याच कार्याला जाऊ नये पण आपण खरंच आगंतुक नाही तर निमंत्रक आहोत’, हे कळल्यानंतरचे गलबलून जाणे सोबतच वयोमानापरत्वेचे सर्व अनुभव, सदिच्छा त्या कार्याला असणे याचा एक प्रहसनात्मक विनोदी तरिही सर्व नात्यांना सजग करणारा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा संदेशात्मक असा एपीसोड म्हणजे २५३ व्वा एपीसोड..! ‘सचिन गोस्वामी व सचिन मोटे’ या भयानक दिग्दर्शक तपस्वींबद्दल अख्खे जग जाणतेच परंतु या भागात प्रा.दिलीप घारे या दिग्गज अभिनेत्याची तपस्या आपण अनुभवू शकतो. सहज काम करत अनुभव मिळवून तज्ञ होणे व तज्ञ आहोत असे न भासवता तो अनुभव सहजतेने रंगमंचावरील सर्वांमध्ये मुक्तपणे पसरवणे याचेच उत्तम उदाहरण म्हणजे प्रा.दिलीप घारे..!
आप्पा म्हणजे दिलीप घारे व माई म्हणजे वनीता खरात यांच्या शेजारील हेमंत ( हेमंत पाटील व रसिका ( रसिका वेंगुर्लेकर) यांच्या मुलिच्या लग्नाची पत्रिका न मिळाल्याने आप्पांची झालेली तगमग तर माईचे आईपणाचे मोठे मन यांतून हे प्रहसन सुरु होते. शेजारच्या हेमंतला आपल्याला पत्रिका द्यायची आठवण कशी काय नाही झाली हा विचार करणारे आप्पा कार्यासाठीचा पोशाख मात्र घालून तयार असतात. माईला रसिकाच्या मुलीचे लग्न म्हणजे घरचेच आहे असे वाटत असल्याने ती पत्रिकेचा विचार न करता जायला निघणार असते परंतु कुठे तरी तीही दुखावलेली असते. पुढे काय काय …कसे भावनीक; मार्मिक घडते ते तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रा ( एपीसोड २५३ ) मध्ये पाहू शकता.
सरते शेवटी हेमंत जेंव्हा आप्पांना सांगतो की निमंत्रकालाच पत्रिका द्यायची पद्धत आपल्यात नसते तेंव्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा ही केवढी विलक्षण मोठी सांस्कृतिक, कौटुंबिक व सामाजिक समावेशाची ‘गंगा ‘ आहे याची प्रचिती येईलच. प्रा. दिलीप घारे यांचा वावर यापूर्वी आपण सिनेमा व मालिकांमधून पहातोयच पण महाराष्ट्राची हास्यजत्रा या पर्वणीत त्यांची सह्याद्रीची एक वेगळीच उंची जाणवते. एपीसोड दरम्यान कधीही न रडू शकतील अशा व्यक्तिंच्या डोळ्यांतील अश्रू अख्ख्या प्रहसनातील ‘सचिन गोस्वामी व सचिन मोटे’ ही तपस्वी जोडी, कलावंत,लेखक, व नेपत्थ्यासकट सर्वांना सलाम करुन जाते.
नात्यांपलिकडच्या नात्यांची ‘ओळख’ व ‘जाणिव’ शिकवणार्या ह्या २५३ व्या एपीसोड मधील हे प्रहसन जरुर पहा..! ( महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील सर्व प्रहसनं ‘अवश्य’ अनुभवतच रहा..!)
सिनेपट | आपली सिंधुनगरी चॅनेल
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)