मालवणात नगरपरीषदेच्या वतीने चिवला बीचवर G-20 शिखर परिषदे अंतर्गत स्वच्छता मोहिम संपन्न.
मालवण | प्रतिनिधी : G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर देशभरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील प्रगतीवर विशेष भर दिला जात आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून समुद्र किनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्षवेधण्याच्या उद्देशाने जगभरातील काही निवडक समुद्र किनाऱ्यांवर रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. G-20 शिखर परिषदे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत भारतातील एकूण ३७ किनाऱ्यांवर एकाच वेळी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मालवण येथील चिवला बीच येथे स्वच्छता मोहीम संपन्न झाली.
केंद्रशासनाच्या निर्देशानुसार मालवण नगर परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता मोहिमेस सुरुवात होण्यापूर्वी निसर्गाबरोबरच मानवी आरोग्याचा संदेश देण्यासाठी मालवण येथील योगज्योती या योगा क्लासेसच्या माध्यमातून अगदी मराठमोळ्या नऊवारी साडीत महिलांच्या योगाचे आयोजन करण्यात आले होते; कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरीकांना स्वच्छतेविषयी जागृत करण्यासाठी सेल्फी केंद्र, सिग्नेचर फलक अशी उभारणी करण्यात आली होती. स्वच्छता मोहिमेची सुरुवात समुद्राच्या स्वच्छतेची व सागरी जैवविविधता रक्षणाची शपथ घेवून करण्यात आली व किनारा स्वच्छतेस प्रारंभ करण्यात आला.
हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमाला मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे, तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक श्री विजय यादव यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी, मच्छिमारांना नेते पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी ,युवा संघटक सौरभ ताम्हणकर , माजी नगरसेविका अनुक्रमे सौ पूजा सरकारे, सौ ममता वराडकर, सौ आकांक्षा शिरपुटे आणि इतर अनेक मान्यवर स्थानिक राजकीय नेतृत्व उपस्थित होते.
या स्वच्छता मोहिमेत सहभागी नागरिकांना सन्मानपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्लास्टिक ऐवजी पर्यावरण पूरक साधनांच्या वापरास प्रोत्साहन म्हणून नगर पालिकेतर्फे कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन श्री अक्षय सातार्डेकर यांनी केले.
कचऱ्याचा विशेषतः प्लास्टिक कचऱ्याचा समुद्र आणि महासागरावर व येथील जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांकडे जागतिक पातळीवर लक्ष वेधणे तसेच यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांच्या सहभागाने समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी व येथील परीसंस्थेचे जतन करण्यासाठी G-20 देशांमध्ये सामुहिक कृती करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता. या आंतरराष्ट्रीय मोहीमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचची निवड करुन मालवणला हा बहूमान दिल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी केंद्र शासनाचे मालवणवासियांतर्फे आभार मानले. केंद्रीय गृहममंत्रालयाच्या प्रतिनिधी अरुणिमा श्री या कार्यक्रमास उपस्थित होत्या त्यांनी मालवणच्या निसर्ग सौंदर्याचे आणि विशेषतः चिवला बीच किनाऱ्याचे आणि स्वच्छता मोहीमेचे उत्कृष्टपणे आयोजन करणाऱ्या पालिका प्रशासनाचे कौतुक केले.
स्वच्छता मोहिमेत शहरातील विविध संस्था, नागरिक, व्यवसायीक, व्यापारी, शासकीय कर्मचारी, पत्रकार, अशा विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते. सर्व सहभागी अधिकारी व नागरिकांचे पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी विशेष आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)