देवगड समुद्रात नौकेने घेतला पेट…!
नौकेतील आठही खलाशांना वाचविण्यात यश ; रविवारी सकाळी ९ :४५ च्या सुमारास घडली घटना.
संतोष साळसकर | शिरगांव :
अचानक आग लागल्याने मच्छीमारी करण्यासाठी गेलेली नौका भर समुद्रात पेटली. सुदैवाने इतर नौका, स्थानिक मच्छीमार तसेच सागरी सुरक्षा विभागाच्या स्पीड बोटीने घटनास्थळी जाऊन नौकेवरील आठ खलाशांना सुखरूप बाहेर काढले. तसेच स्थानिक मच्छीमार व मच्छीमारी नौकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या घटनेत नौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर एक खलाशी भाजल्याने जखमी झाला. महेंद्र यशवंत कांबळे (वय ६०, रा. कोलते, लांजा, जि. रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर प्रथमोपचार करून स्पीड बोटीच्या सहाय्याने तत्काळ देवगड बंदरात आणून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना देवगड समुद्रात १० नॉटीकल मैलामध्ये रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास घडली.
देवगड बंदरातील गणपत भिकाजी निकम यांची पुण्यश्री नौका मच्छीमारीसाठी समुद्रात गेली होती. या नौकेवर आठ कर्मचारी होते. रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास नौकेला अचानक आग लागली. यात खलाशी महेंद्र यशवंत कांबळे भाजले गेले. त्यांचा उजव्या पायाला, मांडीला भाजून दुखापत झाली.
नौकेला आग लागल्याचे समजताच बाजूला मच्छिमारी करणाऱ्या नौकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक मच्छिमारांना समजताच त्यांनीही घटनास्थळी जावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेची कल्पना पोलिस यंत्रणेला देताच देवगड सागरी सुरक्षा पोलिस विभागाचे प्रभारी। पोलिस अधिकारी गणेश आनंद तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संपत जगताप, एएसआय निलेश पाटील, शिवराज कोयंडे, म.पो.नाईक, अमृता बोराडे आदी पोलिस कर्मचारी पंचगंगा या स्पीड बोटीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महेंद्र कांबळे यांच्यावर प्रथमोपचार करून तत्काळ स्पीड बोटीने देवगड बंदरात आणले. पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, तारामुंबरी मच्छिमारी संस्थेचे चेअरमन विनायक प्रभू हे देवगड बंदर येथे उपस्थित होते. पेट घेतलेल्या नौकेचे पूर्णत: नुकसान झाले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)