एकवार पंखावरुनी फिरला असा हात..( विशेष)
मुणगेत आढळून आलेला तो परदेशी पक्षी पोहोचला मायदेशी.
मसुरे | प्रतिनिधी : अबुधाबी वरून भरकटत आलेला व देवगड तालुक्यातील मुणगे येथे आढळून आलेल्या ‘मॅकवींन बस्टर्ड’ या पक्षास पुन्हा पाकिस्तान हद्दीत सोडण्यास वनविभागाला यश आले आहे. ग्रामस्थांनी वेळीच दाखविलेली जागरूकता आणि वनविभागाचे परिश्रम यामुळे परदेशी पक्षाचे जीव वाचविण्यात यश आले आहे.
मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक संजय बांबूळकर याना सदर पक्षी आंबा बागेत थकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्राथमिक उपचारा दरम्यान सदर पक्षाच्या पायावर अबुधाबी देशाचे टॅगिंग असल्याने लागलीच त्यांनी याबाबत मानद वन्य जीवरक्षक प्रा. नागेश दप्तरदार तसेच वनविभागाला कळविले होते. वनपाल सादिक फकीर यांनी लागलीच १० नोव्हेंबर २०२२ रोजी सदर पक्षास ताब्यात घेत कणकवली येथे पशुवैधकीय अधिकाऱ्यांच्या निगराणी खाली उपचार केले होते.
आणि सुरू झाला मायदेशीचा प्रवास
१२ डिसेंबर रोजी देवगड वनपाल सादिक फकीर यांनी सदर पक्षास घेऊन मुबई कार्यालय गाठले. मुंबई येथे वाइल्ड लाईफ क्राइम कंट्रोल ब्युरो कार्यालयात आवश्यक कागदपत्रे देण्यात आली. मुंबई ते जैसलमेर प्रवास विमानाने होणार असल्याने एअर इंडियाच्या कार्गो ऑफिस मध्ये जात पुढील प्रवास बद्दल सादिक फकीर यांनी चौकशी केली. १४ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता पुन्हा सहारा एअर पोर्ट येथे जाऊन पुढील प्रवास निश्चित करण्यात आला.
विमानाने जोधपूर गाठले
विमानतळ प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर सुमारे ११ हजार रुपये या पक्षासाठी भरून घेतल्या नंतर सकाळी ९.३० च्या विमानाने १२ वाजता ते जोधपूर येथे पोहोचले. वन्यजीव विभागाच्या वाहनाने नंतर जोधपूर रेल्वे स्टेशन गाठत पुन्हा सात तासांचा प्रवास करत ते जैसलमेर येथे रात्री १० वाजता पोहोचले. यानंतर १५ नोव्हेंबर रोजी सदर पक्षास वनपाल सादिक फकीर यांनी जैसलमेर वन्यजीव विभागाच्या स्वाधीन केले. पाकिस्तान हद्दी नजीक जैसलमेर वन्यजीव विभागाकडे तो पक्षी सुखरूप स्वाधीन केल्यानंतर त्याला लवकरच त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
वनविभागाचे मिशन फत्ते
एका परदेशी पक्षाचा जीव वाचवून पुन्हा त्या पक्षास सुखरूप त्याच्या अधिवासात सोडता आल्याचा आनंद वनपाल सादिक फकीर यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याचे उपवनसंरक्षक नंदकिशोर रेड्डी, कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुंणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात आली राबविण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)