देवगडच्या पाळेकरवाडीत सापडला दुर्लक्षित ऐतिहासिक ठेवा….!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
देवगड तालुक्यातील पाळेकर वाडी या गावात नुकतीच काही नवीन कातळ शिल्पे इतिहास संशोधन मंडळाच्या संशोधकांच्या पाहण्यात आली आहेत. इतिहास संशोधन मंडळाचे अजित टाककर यांनी देवगडातील काही महत्वाच्या कातळ चित्रांचे फोटोग्राफ आपल्या हॉटेलात प्रदर्शीत केले आहेत. गेल्याच वर्षी त्यांच्या हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या त्यावेळच्या देवगड पंचायत समितीचे सभापती असणाऱ्या रवी पाळेकर यांच्या पहाण्यात हे फोटोग्राफ्स आले. ही चित्रे पाहून अशी कातळ चित्रे आमच्या गावात असल्याचे त्यांनी अजित टाककर यांना सांगितले. यानंतर अजित टाककर, लक्ष्मण पाताडे व महेंद्र देवगडकर यांनी या विषयाचा पाठपुरावा केला. या गावात महेंद्र देवगडकर दोन-तीन वेळा पाहणी करून आले होते. या पाहणीतून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे या भागात संशोधन मंडळातर्फे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वेळच्या कामाचे स्वरूप पाहता स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय ही शोध मोहीम पूर्ण होणे अशक्य होते. अनेक प्रयत्न करूनही कोणताही स्थानिक संपर्क सापडत नव्हता. शेवटी लक्ष्मण तारी यांना पाळेकर वाडी मध्ये तुमची ओळख आहे का? असे विचारले असता, त्यांनी सुंदर पाळेकर यांचा नंबर दिला. त्यांच्याशी पाळेकर वाडीत कातळ शिल्प मोहीम करायचे आहे असे सांगितले असता, त्यांनी ‘शिवप्रेमी प्रतिष्ठान’ च्या अध्यक्षांचा प्रकाश पाळेकर यांचा फोन नंबर दिला. त्यांच्याशी बोलणे केले असता त्यांनी या मोहिमेस प्रतिष्ठान तर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर योग्य दिवस पाहून या मोहिमेची आखणी करण्यात आली.
या मोहिमेत सर्वप्रथम गेल्या वर्षी सापडलेल्या कातळ चित्राची व्यवस्थित साफसफाई करण्यात आली. हे कातळ चित्र पूर्णपणे गवत आणि मातीखाली झाकले गेले होते. शिवाय रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे त्यावर आणखीन नवीन दगड माती येऊन पडली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने येथील कातळ शिल्पांची व्यवस्थित साफसफाई करण्यात आली. त्यांचे नीट सर्व बाजूने फोटो काढण्यात आले. त्यांची व्यवस्थित मोजमापे घेऊन रेखाचित्रे करण्यात आली. हे मांड या प्रकारातील कातळ चित्र आहे. येथे आणखीन काही कातळ चित्रे असावीत असे वाटल्याने अधिक साफसफाई करता आणखीन तीन कातळ चित्रे सापडली.
या कातळ चित्रां विषयी अधिक माहिती देताना प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर म्हणाले, “हे येथील सर्वात मोठे कातळ चित्र आहे. हे मांड या प्रकारातील असून दहा बाय पंधरा फूट त्या मोठ्या आकाराचे आहे. या प्रकारची कातळ चित्रे आता पर्यंत देवगड तालुक्यातील आरे, साळशी, वानिवडे व वाघोटन येथे सापडली आहेत. पाळेकरवाडीतील या कातळ चित्राचा अर्धा भाग झिजला असून उरलेला अर्धा भाग चांगल्या अवस्थेत आहे. याशिवाय दाभोळ सारखे एक कातळ चित्र येथे मिळाले आहे. पण ही केवळ गुडघ्यापासून कोरलेली दोन पावलांची आकृती आहे. ही स्त्रीच्या पावलांची आकृती असावी असे बारकाईने निरीक्षण करता वाटते. अगदी अशाच प्रकारचे एक कातळ चित्र वाघोटन येथे आपणास सापडले आहे. हे एक अतिशय महत्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण कातळ चित्र आहे.” हा एकूण चार कातळ चित्रांचा एकत्रित समूह आहे
या ठिकाणा पासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर आणखीन एक कातळ चित्रांचा समूह आढळून आला आहे. ही अतिशय तीव्र उताराची जागा आहे. येथील जांभा खडक अत्यंत टनक हार्ड अवस्थेतला आहे. पावसाळ्यात या भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाहत असावा असे दिसते. येथे एक हरणाचे अतिशय सुरेख कातळ चित्र आहे. पाटीवर अतिशय सहजपणे चित्र काढावे अशा लयबद्ध रेषांनी हे चित्र काढलेले आहे. या हरणाचे पाय, कान, शेपुट, मान, पोट व्यवस्थित रीतीने काढलेले आहेत. याशिवाय येथे आणखीन काही अमूर्त प्रकारातील कातळ चित्रे आहेत. त्यांचे वर्णन करणे अशक्यच आहे. ती प्रत्यक्षच पाहायला हवीत. असे गुढ चित्रण करण्यात या चित्र काढणाऱ्या कलाकारांचा काय हेतू असावा? हे प्रश्नचिन्हच आहे.
मोहिमेत वेळी पाळेकरवाडीतील ग्रामस्थांनी व शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेत जी बहुमोल मदत केली ती फार मोलाची आहे. अरविंद पाळेकर, सुंदर पाळेकर यशवंत पाळेकर, शामसुंदर पाळेकर व आणि काही अन्य ग्रामस्थ या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. पाळेकर ग्रामस्थांनी ज्या उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभाग घेतला ते कौतुक करण्यासारखे आहे. त्यांच्या सहभागाशिवाय ही मोहीम पूर्ण होणे शक्य नव्हते. अशा उत्स्फूर्त सहभागातूनच कातळ चित्र संवर्धनाची मोहीम यशस्वी होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)