'मुख्यमंत्री फेलोशिप' कार्यक्रम राज्यात २०२३-२४ मध्ये पुन्हा सुरु होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
उच्चशिक्षित व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तरूणांना नाविण्यपूर्ण संकल्पना घेऊन शासनासोबत काम करण्याची मिळणार संधी.
मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील होतकरू युवकांचा राज्य प्रशासनाशी सुसंवाद वाढावा, विकासाच्या संकल्पना, अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग घेता यावा यासाठी यापूर्वी राबविण्यात आलेला ‘मुख्यमंत्री फेलोशिप’ कार्यक्रम २०२३-२४ पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. हा कार्यक्रम लवकरात लवकर कार्यान्वीत व्हावा यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात झालेल्या बैठकीत दिले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाबाबत आज येथे सादरीकरण करण्यात आले.
यापुर्वी हा कार्यक्रम २०१५ ते २०१९ दरम्यान राबविण्यात आला आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, यापुर्वी हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. यामध्ये हा कार्यक्रम पुन्हा सुरु करताना आणखी नवसंकल्पनांचा समावेश
करण्यात यावा. हा कार्यक्रम लवकरात लवकर सुरु करण्याचे नियोजन करण्यात यावे.
यामध्ये राज्यातील उच्चशिक्षण-संशोधनात कार्यरत संस्थांचाही सहभाग घेण्यात यावा. या योजनेमुळे उच्चशिक्षित व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तरूणांना नाविण्यपूर्ण संकल्पना घेऊन शासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कार्यक्रमात तरूण उत्साहाने सहभागी होतात. त्यांच्या उत्साहातून अनेक विकास संकल्पना गतीमान करता येतात. या योजनांमध्ये लोकाभिमुखता आणि आधुनिकता यांचा मेळ साधला जातो.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)