मालवणचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार गोविंद मेस्त्री यांचे निधन
वैभव माणगावकर / मालवण : मालवणचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार आणि हळदीचे नेरूर दुकानवाड येथील रहिवासी गोविंद विश्राम मेस्त्री (वय ५९) यांचे आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
हळदीचे नेरूर दुकानवाड येथील रहिवासी असणारे जी. व्ही. मेस्त्री यांची मनमिळावू तसेच कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळख होती. २९ जून १९९१ रोजी महसूल विभागात ते तलाठी म्हणून रुजू झाले. सर्वप्रथम त्यांनी मालवणला तर तदनंतर वायरी, देवबाग, सुकळवाड आणि देवगडला तलाठी म्हणून काम केले. २० जुलै २०१० रोजी त्यांना शासनाने तलाठी पदावरून बढती देताना मंडळ अधिकारी म्हणून आचरे येथे नियुक्त केले. जवळपास तीन वर्षे इमानेइतबारे मंडळ अधिकारी म्हणून सेवा बजावणाऱ्या मेस्त्री यांची घाटकोपर पूर्व येथे २०२३ साली निवडणूक नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर वैभववाडी येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून काम केल्यानंतर ३१ ऑक्टोबर २०२० रोजी ते मालवण येथे नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर ते मालवण आणि हळदीचे नेरूर याठिकाणी राहत होते. गणेश चतुर्थी असल्याने ते हळदीचे नेरूर येथील आपल्या घरी गेले होते. प्रत्येक पदावर प्रामाणिकपणे काम करून नागरिकांना चांगली सेवा देणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा भाऊ,वहिनी असा परिवार आहे. मालवण मधील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या सहाय्यक शिक्षिका पूनम मेस्त्री यांचे ते पती होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)