बदलत्या वातावरणामुळे यंदा देवगड हापूस एक महिना लांबणीवर..!
८० टक्के आंबा कलमांना मोहोर ऐवजी पालवी..
शिरगांव | संतोष साळसकर :
हवामानामधील सातत्याने होणारा बदल यामुळे बदलत्या वातावरणामध्ये देवगड तालुक्यातील आंबा कलमांना पहिल्या टप्यातील नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या मोहोराऐवजी बहुतांश कलमांना सुमारे ८० टक्के बहारदार अशी पालवी आली आहे. तर १० ते १५ टक्के कलमांना मोहोर आल्याचे दिसून येत आहे.यामुळे सुरुवातीचा मोहोर येण्याच्या वेळेला आंबा कलमांना पालवी आली आहे यामुळे देवगड हापूस आंब्याचे उत्पादन १ महिना लांबणीवरती जाणार आहे.
बदलत्या वातावरणामध्ये देवगड हापूस आंब्याचे पिक घेणे आता बागायतदारांसमोर कठिणच होऊन बसले आहे. ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस व नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिल्या टप्यातील मोहोर येण्यास सुरुवात होते. मात्र यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्येच सुरुवातीचा मोहोर येण्या ऐवजी देवगड तालुक्यामधील ८० टक्के कलमांना बहारदार अशी पालवी आली आहे. तर १० ते १५ टकके कलमांना मोहोर आल्याचे दिसून येत आहे. यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहोर येण्याऐवजी जास्त प्रमाणात पालवी आल्याने सुरुवातीचा आघाडीचा आंबा व बागायतदारांना तारणारा आंबा कमी असणार आहे. सध्या तालुक्यामध्ये आलेला ८० टक्के आलेली पालवीला सर्वसाधारणपणे जानेवारी १५ नंतरच हि पालवी परिपक्व होऊन मोहोर येणार आहे. यामुळे यावर्षी मे महिन्यामध्येच आंबा तोडणीचा हंगाम व सर्वसामान्य खवय्ये गिरींना आंबा चाखता येणार आहे.
यावर्षी समाधानकारक असा पाऊस पडला होता. यामुळे यावर्षी हापूस आंब्याचे पिक भरघोष येणार असे दिसून येत होते. मात्र ऑक्टोंबर महिन्यामध्ये पडलेला अवकाळी पाऊस व थंडी ऐवजी वातावरणामध्ये अचानक उष्णता वाढल्यामुळे व वातावरणामधील असमतोलपणा निर्माण झाल्यामुळे देवगड हापूस आंबा कलमांना मोहोर येण्याऐवजी यावर्षी मोठया प्रमाणात पालवी आली आहे. हि पालवी लवकरात लवकर परिपक्व होऊन मोहोर येण्यासाठी येथील बागायतदार पालवी टिकविण्यासाठी किटकनाशकांची फवारणी व पालवी परिपक्त होण्यासाठी फवारणी व्दारे खते वापरली जात आहेत. काही बागायतदारांनी कल्टार हि संजीवनी आंबा कलमांना वापरली आहे. यामध्ये काहि कलमांना डिसेंबर महिन्यामध्ये मोहोर येवू शकतो. व ज्या हापूस कलमांना कल्टार संजीवनी वापरुनही मोहोर येण्याऐवजी पालवी आली आहे. अश्या काही कलमांनाही पालवी परिपक्व होण्याअगोदरही म्हणजेच डिसेंबर महिन्यापर्यंत आंबा कलमांना मोहोर येवू शकतो असे सांगितले जात आहे.
गेल्यावर्षी देवगड हापूस आंब्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे होते मात्र फळमाशीने थैमान घातल्यामुळे आंबा उत्पादनावरती मोठा परिणाम झाला होता. मात्र हि फळमाशी अदयापही आंबा कलमांवरती दिसून येत होती. मात्र किटकनाशकांची फवारणी केल्यानंतर हि फळमाशी नष्ट झाल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र यापुढे अवकाळी पावसाने अधून मधून हजेरी लावली तर फळमाशी पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सन २००१ ते सन २९१२ पर्यत देवगड हापूस आंबा कलमांवरती खार हे काळे द्रव्य पडून आंबा मोहोर खराब होण्याचे प्रमाण जास्त होते. हि खार एक दरम्यानच्या कालावधीमध्ये बागायतदारांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र यावरती अनेक औषधे निर्माण झाल्यामुळे आज खार म्हणजेच काळे द्रव्य मोहोरावरती पडणारी समस्या किटकनाशकामुळे दुर झाली आहे. त्यानंतर सन २०१० सालापासून थ्रीप्स या रोगाने तालुकयामध्ये आंबा कलम मोहोरावरती थैमान घातले. ते सन २०२० साला पर्यंत थ्रीप्स् या रोगावरती आंबा बागयतदारांना महागडी अशी औषधे वापरुन सामोरे जावे लागत होते. या थ्रीप्स रोगामुळेच महागडी किटकनाशके बागायतदारांना फवारणी करावी लागत होती. यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था आंबा बागायतदारांची थ्रीप्स या रोगाने केली होती. आता थ्रीप्स वरती देखील अनेक औषधे निर्माण झाल्याने थ्रीप्स हा रोग आटोक्यात येत असताना पुन्हा आंबा बागायतदारांसमोर फळमाशी हे मोठे संकट गेल्यावर्षी पासून उभे येवून ठेपले आहे. या फळमाशीचा याहि वर्षी प्रादुर्भाव निर्माण झाला तर याकडेही कोणती औषधे संशोधन करुन निर्माण करतात याकडे देखील लक्ष बागायतदारांचे लागून राहिले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)