विलवडे श्री माऊली मंदिरात देवस्थान कमिटीच्या वतीने आबा दळवी यांचा सपत्नीक सत्कार…!
बांदा | राकेश परब :
विलवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा कृपाशिर्वादामुळे प्रत्येक पदावर जबाबदारी व प्रामाणिक पणे काम करत आहे. यामुळेच आपण राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकलो.राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना देवस्थान कमिटी,देव मर्यादा व ग्रामस्थांची कौतुकाची थाप आपल्याला नेहमीच प्रोत्साहन देते.यापुढेही गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी योगदान देण्याची ग्वाही विलवडे गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रामचंद्र उर्फ आबा दळवी यांनी दिली. आबा दळवी यांची गोर गरीब आणि ज्येष्ठ नागरीकांचा आधारस्तंभ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे. विलवडे गावच्या विकासा साठी प्रयत्न करुन माणुसकीचा वारसा जपत आहे.श्री देवी माऊली देवीच्या मंदिर बांधकामासाठी २५ लाख रूपये देणगी दिलेली आहे. श्री देवी माऊली मंदीर बांधकामाचा सर्वस्वी भार स्विकारुन गावाला धार्मिक भावनेतून गावातील वातावरण भक्तिमय करुन आनंदी करण्यास प्रमुख भुमिका निभावत आहेत.२०२१ मध्ये तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी भर वस्तीत शिरल्याने विलवडे गावातील नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना २ लाख ९५ हजारांची मदत केली होती. या पार्श्वभूमीवर विलवडे माऊली मंदिरात वार्षिक जत्रोत्सवानिमित्त आबा दळवी व सीता दळवी या दोन्ही उभयतांचे देवस्थान कमिटीच्या वतीने ओटी, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आबा दळवी बोलत होते. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी, विष्णु देऊलकर, माजी उपसरपंच प्रकाश दळवी, शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते प्रमोद दळवी,प्रगतशील युवा शेतकरी कालिदास दळवी, देवस्थान कमिटीचे विनायक दळवी, सुरेश सावंत,महेंद्र दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)