सरकारी नोकर भरतीचा मार्ग माेकळा ; सरळसेवा काेट्यातील ७५ हजार रिक्त पदे भरणार.
मुंबई | ब्यूरो न्यूज : राज्यात ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने त्या दृष्टीने ठोस पाऊल टाकत यापूर्वी नोकर भरतीवर असलेले निर्बंध हटविले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सरळसेवा कोट्यातील ७५ हजार पदे भरण्याचा सरकारचा मानस असून, त्याच्या पूर्ततेसाठी शासन आदेश काढण्यात आला. ज्या विभागांचा/ कार्यालयांचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा दिली आहे. ३० सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार सुधारित आकृतिबंध निश्चित झालेल्या विभागांना एमपीएससी कक्षेतील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली होती. अन्य संवर्गातील रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्याची मुभा होती. ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभागांमधील गट अ, गट ब, गट क मधील (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. नोकर भरतीवरील निर्बंधांतून दिलेली शिथिलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)