सप्त सुरांनी सुरमय झाली दिवाळी पहाट..!
मसुरेत सारेगम वाद्यवृंदाची संगीत मैफिल.
मसुरे | प्रतिनिधी :
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.. अभ्यंग स्नानाच्या उटण्याचा गंध वातावरणात पसरला असतानाच व पहाटेच्या काकड आरतीचे स्वर कानात गुंजन असतानाच संगीताची अनोखी मैफिल रंगली होती ती मसुरे कावावाडी येथील श्री हनुमान मंदिर येथे! येथील ‘सारेगम’ वाद्यवृंदाने दीपावलीची पहाट भूपाळी,अभंग व भक्ती गीतानी श्रवणीय केली.
कार्यक्रमाचा प्रारंभ गुरुवंदनेने झाला. सौ प्राजक्ता झुंजार पेडणेकर यांनी ‘ प्रभाती सूर नभी रंगती’ ही भूपाळी म्हणत संगीत मेजवानीला प्रारंभ केला. त्यानंतर बाळू दळवी यांनी ‘ देव देव्हाऱ्यात नाही ‘ हे भक्ती गीत तर झुंजार पेडणेकर यांनी दत्त भक्तीने प्रेरित करणारे ‘ गुरू चरण करिती रे भ्रमण’ हे भक्ती गीत सादर केले. पंढरीनाथ मसुरकर यांनी ‘ आम्ही काय कुणाचे खातो’ तर बाबू मुळीक यांनी ‘ दत्त दत्त नामाचा महिमा’ हे भक्ती गीत सादर करत मैफिलीत रंगत आणली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बाळू दळवी यांनी ‘ संत भार पंढरीत’ सौ प्राजक्ता पेडणेकर यांनी ‘ मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी वाणी’ पंढरीनाथ मसुरकर यांनी ‘ दसरा दिवाळी तोचि आम्हा’ तर राजू खोत यांनी ‘ अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान’ हे भक्ती गीत सादर केले. कार्यक्रमाची सांगता झुंजार पेडणेकर यांनी ‘सजल नयना नीता धार बरसती’ या भैरवीने केली. भूपाळी, भावगीते,भक्ती गीते,अभंग यांनी रंगलेल्या या कार्यक्रमास संगीतासाथ हार्मोनियम बाबू मुळीक, तबला सचिन कातवणकर, मृदुंग लौकिक भोगले, खंजिरी पंढरी मसुरकर, कोरस साथ मनस्वी पेडणेकर हिने केली.
कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन बबन वायंगणकर यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मसुरे कावावाडी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)