ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
लागलीसे आस मजला……!

लागलीसे आस मजला……!

प्रकाशन: 08 Sep 2021 05:24 PM
वाचन संख्या 241

प्रणय देवदत्त पुजारे / मुणगे : बाप्पा !!! आमचा सगळ्यांचा लाडका बाप्पा…अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना आपलासा वाटणारा आमचा बाप्पा!!!
बघता बघता वर्ष सरुन गेलं, गेल्या वर्षी तुला समुद्रात विसर्जित करताना ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत वर्ष कधी होऊन गेलं हे काही कळलंच नाही. ११ दिवस मखरात आणि वर्षाचे इतर दिवस प्रत्येक भक्ताच्या हॄदयावर आणि मनामनात अधिराज्य गाजवनारा तू, माझा बाप्पा!! आता पुन्हा एकदा तुझ्या आगमनाची , तुझ्या दर्शनाची आणि तुझ्या त्या देखण्या रूपाची ओढ लागलीय.
संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आलं, कित्येक माणसं दगावली, कित्येकांचे आपले त्यांना सोडून गेले, संपूर्ण जगावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला; पण प्रत्येकाच्या मनात ठाम विश्वास होता आणि अजूनही आहे, की माझा बाप्पा जगाला या संकटातून बाहेर काढेल. आजूबाजूला सगळीकडे कोरोनाचा हाहाकार चालू असतानासुद्धा तुझ्या उत्सवासाठी लोकांचा उत्साह किंचितही कमी झाला नव्हता, हो, थोड्या प्रमाणात नियमांची बंधनं होतीच, पण त्याने फरक पडेल तो गणेशभक्त कसला! अगदी त्या नियमांचं पालन करत अनेक मोठमोठ्या मंडळांनी उत्सवामध्ये थोडासा बदल करत जनतेची सेवा केलीच, जनसेवा! आरोग्यसेवा!! आणि तुझ्या उत्सवातून तेच तर साध्य करायचंय…
कोकण!!! कोकणातला गणेशोत्सव म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय! पण बाप्पा, आज तुझा हा लाडका कोकणी भक्त कोलमडलाय.. वादळ, महापूराशी झुंज देतोय. महापुर आला, घराघरात पाणी शिरलं, कित्येक संसार वाहून गेले, उद्ध्वस्त झाले; पण तरीही ताठ मानेने आणि आत्मविश्वासाने तो पुन्हा उभा आहे , कारण त्याला माहित आहे की आपला बाप्पा येणार आहे…
बाप्पा, तुझी रुपं तरी किती रे?…कोरोना महामारीत डॉक्टर, नर्सच्या रुपात येऊन रुग्ण वाचवनाराही तूच आणि पोलिसांच्या वेशात ड्यूटी बजावनाराही तूच… महापुरामध्ये लोकांना मदतीचा हात देणाराही तूच आणि अगदी रस्त्यावर उतरून कचरा, गाळ साफ करणाराही तूच…मोठमोठ्या प्रसिद्ध व्यक्तिंचे आराध्यदैवत असणारा दगडुशेठ हलवाई आणि सिद्धिविनायकही तूच आणि अगदी छोट्याशा झोपडीत गरीबांच्या मनोकामना पुरवणारा विघ्नहर्ताही तूच…!!!
पण बाप्पा, खरं सांगू का? आम्हाला बघायचंय तुझं ते रूप….ज्यामध्ये उत्सव तर मोठा आहेच पण त्याहीपेक्षा आगमन किती भव्यदिव्य असू शकतं हे दाखवणारा चिंचपोकळीचा चिंतामणी…अनेक तास रांगा लावून केवळ काही सेकंदांसाठी दर्शन देऊन नवसाला पावणारा लालबागचा राजा…संकटं कितीही मोठी असली तरी त्याहीपेक्षा मोठा माझा बाप्पा आहे हे दाखवणारा गणेशगल्लीचा राजा… भक्तांच्या खांद्यावरुन जाणारा तेजुकायाचा राजा…कमरेवरती हात घेऊन उभा राहणारा काळाचौकीचा महागणपती… भक्तांवर कृपादृष्टी ठेवणारा परळचा राजा…आणि अशी तुझी कित्येक रुपं….
नियमांमध्ये अडकून तुझा उत्सव साजरा करायची सवय नाही रे… तुला पुन्हा एकदा त्याच देखण्या रुपात, त्याच रुबाबात आणि त्याच उत्साहात बघायचंय. ते स्वप्नवत् वाटणारे 11 दिवस, त्याच स्वप्नात जगायचंय, भक्तिरसात न्हावून जायचंय! ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत तल्लीन होऊन नाचायचंय, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत तुझं विसर्जन करुन पुन्हा त्याच उमेदीने तुझी वाट बघायचीय…..
हे सगळं अनुभवायला,,,,येशील ना रे बाप्पा?!?!?!?….

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स