पणजीकडे उड्डाण केलेल्या विमानात धुराचे लोट…!
हैद्राबाद | ब्युरो न्यूज : देशांतर्गत हवाई सेवेतील एका उड्डाणा दरम्यान काल हैद्राबादहून गोव्यातील पणजीसाठी उड्डाण केलेल्या विमानात काही क्षणातच कॉकपिट आणि केबिनमधून धुराचे लोट पसरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पायलटने प्रसंगावधान राखत तात्काळ हैदराबाद विमानतळावर इमर्जेन्सी लँडिंग केल्याने मोठा अपघात टळला. अचानक विमानात तयार झालेल्या धुरामुळे प्रवासी प्रचंड घाबरलेले होते. त्यानंतर विमान सुरक्षितक्षितरित्या खाली उतरल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेत काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विमानामध्ये नेमका धूर का निघाला याची चौकशी होणार असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
स्पाइसजेट कंपनीचे ‘क्यू-४०० एयरक्राफ्ट व्हिटी एसक्यूबी’ हे विमान ८६ प्रवाशांना घेऊन पणजीसाठी निघाले होते. परंतु उडाण केल्यानंतर काही मिनिटांतच त्याच्या कॉकपिट आणि केबिनमधून धुराचे लोट निघू लागले. त्यामुळे काही प्रवाशांना श्वसनाचाही त्रास जाणवू लागला. ही बाब पायलटच्या लक्षात येताच त्याने तत्काळ हैदराबाद विमानतळावर विमान उतरवले. या अपघातग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने त्याच्या ट्विटर हँडलवर या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत.
त्यात विमानात चोहीकडे धूर पसरल्याचं दिसत असून व्हिडिओत विमान सुरक्षितरित्या लॅडिंग करत असल्याचे दिसत आहे.
वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) उन्हाळ्यातील विमान वाहतुकीवर ५० टक्क्यांची मर्यादा लागू केली आहे. यापूर्वी डीजीसीएने २७ जुलै रोजी स्पाइसजेटच्या उडणांवर आठ आठवड्यांसाठी निर्बंध घातले होते. गेल्या महिन्यात या निर्बंधाचा कालावधी एक महिन्याने वाढवून २९ ऑक्टोबरपर्यंत केला गेला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)