बोगस फोन कॉल पासून सावधगिरी बाळगण्याचे कणकवली पोलिसांचे आवाहन.
अमिषांना बळी न पडण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले आवाहन.
कणकवली | ब्युरो न्यूज : समाजातील अनेक समस्यांबाबत जागरुकतेबाबत वेळोवेळी आवाहन करणार्या कणकवली पोलिस विभागाने सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली असताना फेक कॉल करत आर्थिक फसवणुकीचे प्रकारही राज्याच्या काही भागात सुरू झाले आहेत व त्या बोगस तथा फेक कॉलपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले आहे.
याबाबत उदाहरण देताना पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर म्हणाले, आपले मोबाईल नंबर अनेक ठिकाणी अटॅच असतात. असे मोबाईल हेरुन फसवणुक करणारे त्या मोबाईल धारकाला फेक कॉल करतात. आम्हाला एका ठिकाणी सोने सापडले आहे जर ते पोलिसांकडे दिले तर शासन दरबारी जमा होणार आहे. त्यामुळे हे सोने आम्ही तुम्हाला कमी किमतीमध्ये देतो तुम्ही त्याचे काय ते करा आणि अधिक पैसे कमवा असे आमिष दाखवले जाते. असे एक – दोन वेळा कॉल केले जातात. सोन्याच्या आमिषाने कोणीही बळी पडू शकतो. मग अशा व्यक्तीला ते तुम्हाला कुठे भेटू, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही येतो किंवा आम्ही सांगतो त्या ठिकाणी या असे सांगितले जाते. येताना ठराविक एक रक्कम आणण्यास सांगितले जाते. त्रयस्थ ठिकाणी त्या व्यक्तीला बोलावून त्याला शस्त्राचा धाक दाखवत त्याच्याकडील पैसे आणि दागिने लुबाडले जातात. असे प्रकार राज्याच्या काही भागात झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फेक कॉलपासून सावध रहावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)