पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाचा पर्यावरण पुरक देखावा..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
अडथळाविरहित वातावरण निर्माण करणे हि आजच्या काळाची गरज आहे. देशाच्या एकुण लोकसंख्येपैकी 3 टक्के व्यक्ती दिव्यांग आहेत. शारीरिक आणि मानसिक अंपगत्व असणारे लोक, जेष्ठ नागरिक, लहान मुले , गरोदर महिला, ॲसीड पिडीत तसेच तृतीयपंथी अशा सर्व व्यक्तींना वैयक्तिक आणि सार्वजनिक ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास खऱ्या अर्थाने भारत सुगम्य आणि सुसज्ज होईल. असा “सुगम्य भारत, सुसज्ज इंडिया” सांगणारा एक पर्यावरण पुरक देखावा डिलाईरोड मुंबई येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा साकारला आहे.
शाळा, दवाखाने, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी स्वयंचलित रॅम्स तसेच सहज वावरता यावे यासाठीच्या सोयी, रस्त्यावर दिव्यांग विशेषतः दृष्टीबाधित व्यक्तींना सिग्नल कळावा यासाठी स्वयंचलित सिग्नल, इमारती फुटपाथ, उतार, वळणे या सर्व ठिकाणी सुयोग्य रॅम्प्स, रेलिंग, आधारासाठी कठडे की किंवा आधार यासाठीचे उपाय संपूर्ण देखाव्यासून दाखविले आहे.
सुलभ व सहज प्रवास व संपर्क केवळ अपंगाचीच नव्हे तर सर्वाची गरज आहे. रेल्वे, विमान, बस, टॅक्सी व रिक्षा अशा सर्व प्रकारच्या प्रवासी साधनातून अपंग व्यक्तींना प्रवास करणे शक्य व्हावे यासाठी जमिनीचा पृष्ठभाग, पायऱ्या, रॅम्प्स, सिग्नल, प्रवेशद्वार, वाहनतळ आदीचा विचार केला आहे.
शाळा, हॉटेल्स, सिनेमागृह, सार्वजनिक उद्याने, वैद्यकीय उपचार केंद्र, औषधविक्रीची दुकाने (औषधांचे पॅकेट) मॉल्स अशा सर्वच ठिकाणी दिव्यांगांसह सर्व व्यक्तींना सुलभ भाणि सुगम्य वातावरण निर्मिती देखाव्यातून मांडण्यात आली आहे.
देशाला स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊन अजुनही ॲक्सेसीबल भारत होत नाही आहे, यावर प्रकाश यंदा मंडळाने टाकला आहे. विविध प्रकल्पातून “ॲक्सेसीबल इंडीया” या विषयावर अतिशय देखण्या पद्धतीने पर्यावरणाला धरून हा देखावा कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी साकारला आहे.सुनिल कल्याणकर यांनी मूर्ती संपूर्ण शाडुच्या मातीची बनवली असून संपूर्ण सजावट सुगम्य आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)