रघुवीर वायंगणकर यांना "महाराष्ट्र रक्षक पुरस्कार" प्रदान..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावचे सुपुत्र व घाडीगांवकर सह. पतपेढीचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर यांना “महाराष्ट्र रक्षक पुरस्कार” कणकवली येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. प्रकट महाराष्ट्र साप्ताहिक व वृत्तवाहिनी यांच्या तर्फे कणकवली तहसीलदार रमेश जे. पवार, कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या हस्ते “महाराष्ट्र रक्षक पुरस्कार” रघुवीर वायंगणकर यांना प्रदान करण्यात आला.
यापूर्वी वायंगणकर यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, महाराष्ट्र समाज भुषण गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, सिंधुदूर्ग रत्न पुरस्कार,कोकण रत्न पुरस्कार आदी विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नारिंग्रे शिक्षण संस्था, मुंबईचे सहचिटणीस म्हणून सुद्धा ते काम पाहत आहेत.तर मराठी वृत्तपत्रलेखक संघ, महा. राज्यचेते सदस्य आहेत.श्री रघुवीर वायंगणकर हे सामाजिक बांधिलकीतून घाडीगावकर समाजाचे वधू वर मेळावे आयोजित करतात. रघुवीर वायंगणकर यांनी समाजात विविध क्षेत्रात चांगले समाजकार्य करण्या बरोबरच गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत कोविड जनजागृती करून कोविड पिडीतांची सेवा सुध्दा केली होती. कोविड काळातील योगदान लक्षात घेऊन साप्ताहिक प्रकट महाराष्ट्र व प्रकट महाराष्ट्र वृत्तवाहिनी च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते त्यांना “महाराष्ट्र रक्षक” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मुंबई बीपीटीचे कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी विद्याधर राणे, सहसंपादक महंमद मोनये, ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकट महाराष्ट्राचे मुख्य. संपादक दत्ताराम दळवी यांनी केले. मान्यवरांनी कोरोना काळातील बरे वाईट अनुभव सांगून पुरस्कार प्राप्त उपस्थितांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृत्त निवेदिका फिजा मोनये यांनी तर आभार रवींद्र कोतापकर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)