स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या 'माजींचा' 'आजींना' संरक्षक दिलासा..!
माजी विद्यार्थी संघटना व मालवण स्पोर्टस् क्लबमार्फत
माजी विद्यार्थी व महाराष्ट्र पोलीस दलातील विद्यार्थ्यांचा सत्कार.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना व मालवण स्पोर्टस् क्लबतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एक अनोखा सत्कार सोहळा संपन्न झाला. स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जे आता गृहरक्षण,संरक्षण तथा पोलीस दलात कार्यरत आहेत त्यातील काहींचा सत्कार स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.नंदू देसाई यांनी केले व सर्व उपस्थित मान्यवर तथा सध्या विविध पदांवर गृह संरक्षण सेवा बजावणार्या माजी विद्यार्थ्यांना मंचावर आमंत्रीत केले. माजी विद्यार्थी व माजी पं.स.अध्यक्ष अनिल निव्हेकर यांनी मान्यवरांना मंचावर स्थानापंन्न केले.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष , महाविद्यालयाच्या प्राचार्य उज्वला सामंत व इतर पदाधिकार्यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
नंतर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सर्व उपस्थित मान्यवरांच्या कार्याचा व सेवेचा थोडक्यात आढावा घेतला. अध्यक्षस्थानी प्राचार्या उज्वला सामंत तर माजी प्राचार्य मेजर गिरसागर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी सर्वात प्रथम माजी विद्यार्थी व मुंबई पोलिस दलातील पोलीस पदक विजेता सादीक मुज़ावर यांचा माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
नंतर पोलीस बाबा गिरकर, पोलिस हेमंत पेडणेकर, पोलिस जनार्दन रेवंडकर, पोलिस महेश पांगे, पोलीस दीपक वाणी , पोलीस सुधीर कदम, महिला पोलीस शिल्पा धामापूरकर या माजी विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.
मालवण स्पोर्टस् कल्बचे अध्यक्ष नंदन देसाई, विक्रम मोरे, पपू धुरी तसेच माजी विद्यार्थी संघटनेतर्फे राजू बिडये,अनिल निव्हेकर,संदेश कोयंडे,दीपक कुडाळकर,महेश काळसेकर, अभय कदम,प्रदीप नाईक साटम यांनी मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन गौरविले.
यावेळी माजी विद्यार्थी व पोलीस पदक विजेते सादीक मुज़ावर यांनी उपस्थित आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सादीक मुज़ावर यांनी आजी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले की त्यांना कोणतीही अडचण आली तरी कोणत्याही क्षणी मंचावर उपस्थित सर्व पोलीस वीर मदतीला तयार असतील. कुठेही अडचण आली तर आपण स्वतः धावत येऊन ती दूर करु असा दिलासा त्यांनी उपस्थित आजी विद्यार्थी व एन.सी.सी. कॅडेटस् यांना दिला.
पोलिस उन्मेष पेडणेकर ,बाबा गिरकर ,जनार्दन रेवंडकर व शिल्पा धामापूरकर यांनी आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोलीस अधिकारी सुधीर कदम यांनी मिष्किल शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांना इंग्लिश भाषेचे महत्व , मंचधीटपणाचे मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी मेजर गिरसागर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. त्यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.
प्राचार्या उज्वल सामंत यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सर्व माजी विद्यार्थी व पोलीस दलातील अधिकार्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व आजी विद्यार्थ्यांना दिलेल्या दिलास्याबद्दल आनंदाचे समाधान व्यक्त केले.
या सोहळ्याला वनपरिक्षेत्र अधिकारी, महाविद्यालयातील एन.सी.सी.चे प्राध्यापक खोत,एन.सी.सी.कॅडेटस् व प्राध्यापक वर्ग , वरीष्ठ लिपीक गोसावी उपस्थित होते.
लायनेस क्लबच्या अध्यक्ष व माजी विद्यार्थीनी वैशाली शंकरदास यांनी सर्वांचे आभार मानले.
उपस्थित मान्यवर व विद्यार्थी वर्गाला कार्यक्रमानंतर अल्पोपहार देण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)