<em>सिंधुदुर्गातील मळगावमध्ये अनोख्या पध्दतीने होते नागपंचमी साजरी..!</em>
पंचमुखी नागासह दिड दिवस नागपंचमी उत्सव साजरा ; दोनशे वर्षापासूनची परंपरा.
चिंदर | विवेक परब :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव रस्तावाडी येथील धर्मनाथ गोसावी घराण्यात चक्क दिड दिवसाची नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही अविरत सुरु आहे. गेली दोनशे वर्षाहूनही अधिक काळ गोसावी घराण्याकडून या परंपरेच जतन केले जात आहे. याचे विशेष म्हणजे नागोबा पाच फणांचा असतो.
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून ‘नागपंचमी सर्वत्र भक्तीपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. पारंपारिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्रा विषयी प्रेम निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमी या सणाकडे पाहिले जाते. या निमित्त शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाच्या प्रतिमेचे विधिवत पूजन केले जाते. मातीच्या नाग प्रतिमेचे पूजन करुन तिला लाह्या व दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. सकाळी मूर्ती आणून सायंकाळी विसर्जन केले जाते.
मात्र मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात दिड दिवस नागोबाचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येते. वडिलोपार्जित चालत आलेली ही परंपरा कै. शांताराम बंडू गोसावी व कै रामचंद्र बंडू गोसावी यांच्या नंतर त्यांची मुल धर्मनाथ शांताराम गोसावी, संजय शांताराम गोसावी, सतिश रामचंद्र गोसावी, चंद्रकांत बाबी गोसावी व त्यांचे कुटुंबीय जतन करीत आहेत. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राम्हण भोजन व एकादशमी केली जाते. नागपंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून ती आकर्षक अशी सजवण्यात येते. विधिवत पूजा करुन दुपारी रात्री आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी व दुपारी नागाला करंज्याचा नैवेद्य दाखवला जातो. सांयकाळी नागाचे अळूच्या पानावर विसर्जन केले जाते. विसर्जना नंतर शेगलाची भाजी व भाकरी प्रसाद दिला जातो.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)