काळसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती आता एका क्लिक वर..!
मान्यवरांनी केले वेबसाईटचे लोकार्पण….!
चौके |अमोल गोसावी :
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कोणत्याही संस्थेची अथवा व्यवसायाची वेबसाईट असणे ही काळाची गरज बनली आहे. त्याअनुषंगाने अनेक शैक्षणिक संस्थानीही आपापल्या वेबसाईट बनविलेल्या आहेत. यामध्ये आता भर पडली आहे ती मालवण तालुक्यातील काळसे येथील श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला , वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेबसाईटची.
काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, श्री हेमंत परब यांच्या संकल्पनेतून आणि अथक परिश्रमातून व त्यांच्या कौटुंबिक सहकार्यातून काळसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची वेबसाईट प्रत्यक्षात कार्यरत झाली आहे. इतर हायस्कूलप्रमाणे आपल्याही हायस्कूलची वेबसाईट असावी असा संस्था पदाधिकाऱ्यांचा मानस होता आणि तो आता प्रत्यक्षात उतरला आहे. ही वेबसाईट बनविण्यासाठी अध्यक्ष, हेमंत परब यांना माजी विद्यार्थी सेवा संस्थेचे अध्यक्ष, विनोद गोसावी, संचालक गजानन प्रभु, यांच्यासह इतर संस्था पदाधिकारी व संचालक तसेच मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर यांचेही बहुमोल सहकार्य लाभले. ही वेबसाईट प्रणाली सुरु करताना त्यात आपल्या शाळा – संस्था यांची आजवरची वाटचाल, संस्थेपुढील आजची आव्हाने -उद्दिष्टे मांडत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घ्यावयाचे परिश्रम याचा पारामर्श घेतला आहे. या वेबसाईटमुळे काळसे हायस्कूलचा इतिहास तसेच संस्थेविषयीची, संस्थेच्या उपक्रमांची संपूर्ण माहिती, प्रशालेकडून पुरविल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा याबद्दल सविस्तर माहिती जगभरात कुठल्याही व्यक्तीला एका क्लिकवर समजणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसाठी वाचनीय अशी काही पुस्तकेही वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वेबसाईटमुळे जगभरातून वैचारीक तसेच आर्थिक सहकार्यदेखील संस्थेला उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच आपल्या काळसे गावाचा व हायस्कूलचा नावलौकिक निश्चितच वाढणार आहे.
संस्थेने बनविलेल्या http://kalsedhamapureducation.com/resource/home.aspx या शैक्षणिक वेबसाईटचे लोकार्पण बॅरिस्टर नाथ पै हायस्कूल, कुडाळचे माजी मुख्याध्यापक अशोक येजरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्था अध्यक्ष हेमंत परब , परफेक्ट ॲकॅडमीचे राजाराम परब, अध्यापक विद्यालय आजगावचे प्राध्यापक रूपेश पाटील , उपाध्यक्ष योगेश राऊळ ,सचिव केशव सावंत, संचालक व सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी, सेवानिवृत्त तहसीलदार शरद गोसावी, संचालक गजानन प्रभु, राजन प्रभु, माजी संचालक सुवर्णा काळसेकर, माजी मुख्याध्यापक किशोर वालावलकर, विद्यमान मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर , सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)