<em>इन्सूलीत भरधाव कारची स्थानिक पादचा-यांना जिवघेणी धडक..!!</em>
एक पादचारी जागीच ठार..तर दूसरा गंभीर..!!
बांदा | राकेश परब :
मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली कुडवटेम्ब येथे पुण्याहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या आलिशान कारने दोघा पादचाऱ्यांना उडवले. ही धडक एवढी जबरदस्त होती की यात एक पादचारी जागीच ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. महादेव वसंत झाटये (४५) असे मयताचे नाव आहे. तर विलास पांडुरंग कुडव हे या धडकेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळीत उपचार सुरु आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी बांदा पोलीसात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याच्या कडेला नेहमीप्रमाणे कामावर जाण्याकरता महादेव झाटये व विलास कुडव उभे होते. दरम्यान पुण्याहून गोव्याच्या दिशेने जाणारी (एमएच१४जेआर७११७) कार साईड पट्टीच्या खाली आली व रस्त्याच्या बाजूला असलेल्या त्या दोघांनाही उडवले. यात महादेव झाटये गाडीला मधोमध आपटले व महामार्गावर आदळले. ते सुमारे ४० फूट फेकले गेल्याने त्यांचे डोके रस्त्याला आदळले व रक्तस्राव होऊन ते जागीच ठार झाले.
त्यांच्या सोबत असलेले विलास कुडव हे गाडी सोबत फरफटत गेले व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या बुंध्याला अडकले. त्यांच्या पायाचे हाड मोडले तर हातावरून गाडी गेल्याने हाताला सुद्धा दुखापत झाली.
भरवस्तीत महामार्गावर अपघात झाल्याने समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी महादेव झाटये यांना मृत घोषित करण्यात आले. अपघातानंतर बांदा पोलीस सहाय्यक निरीक्षक श्यामराव काळे घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक भूषण चंद्रकांत राऊत (रा.हवेली, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या कारमधील युवक गोवा येथे पर्यटनासाठी जात होते.
मयत महादेव झाटये हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अपघाती जाण्याने इन्सुली गावावर शोककळा पसरली आहे. मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. परिसरात ते दाजीबा या नावाने प्रसिद्ध होते. मात्र शुक्रवारी सकाळी ते रोजंदारीच्या कामासाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)