<em>वेंगुर्ले भाजपा शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांची घेतली भेट..!</em>
नगरपालिकेतील ६० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकल्याचे प्रकरण.
चिंदर | विवेक परब : वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपालिकेतील ६० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकल्याने त्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व कामगार आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. शहरातील कचरा उचलत जात नसल्याने शहरात कचर्याचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत भाजपाने आवाज उठवला आहे, तसेच त्या कंत्राटी कामगारांच्या पाठीशी भाजपा ठामपणे उभा राहिला असुन या प्रश्नाची उकल होण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष राजन गीरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालावा अशी मागणी केली.
भाजपा शिष्टमंडळाने यावेळी जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करताना सांगितले की वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आदर्शवत असुन अनेक राज्यस्तरीय व केंद्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये या कंत्राटी स्वच्छता कर्मचार्याचा मोलाचा वाटा आहे. परंतु प्रशासकीय कारभार सुरु झाल्यापासून त्यांच्या पगाराच्या बाबतीत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. म्हणून जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालून सदर कामगारांच्या पगाराचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे ताबडतोब पाठविण्याबाबत मुख्याधिकारी यांना निर्देश द्यावेत अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने केली.
तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून काम करत असलेले प्रांताधिकारी यांचीही सावंतवाडी येथे जाऊन भेट घेतली व लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केली.
कंत्राटी कामगार कमी झाल्याने कायम असलेल्या कामगारांवर कामाचा ताण आलेला आहे. तसेच नगरपरिषद कार्यालयातील सर्व प्रशासकीय कामे सांभाळणारे अधिकारी/कर्मचारी यांचा अर्धा दिवस कचरा गोळा करणारया कामावर लक्ष देण्यासाठी जात असल्यामुळे कार्यालयात दुपारी १२ ते १२:३० पर्यंत शुकशुकाट असतो. परिणामी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो व कामही होत नाही. त्यामुळे आगामी काळात प्रलंबित कामांचा डोंगर नगरपालिकेत तर कचर्याचा डोंगर शहरात दिसणार आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)