<em>४ लाख ५१ हजार २०० रुपयांच्या दारुसह केला ११ लाख ५१ हजार २०० रुपयांंचा मुद्देमाल जप्त…!</em>
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यालगतचे राज्य गोवा बनावटीच्या दारूची इनोव्हा कारमधून अवैध वाहतूक करताना उत्पादन शुल्क विभागाने इन्सुली तपासणी नाक्याजवळ केलेल्या कारवाईत ४ लाख ५१ हजार २०० रुपयांच्या दारुसह एकूण ११ लाख ५१ हजार २०० रुपयांंचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कणकवली येथील चेतक भरत वाळवे (२५, रा. तिवरे) याला ताब्यात घेण्यात आले. कारमधून गोवा बनावटीच्या दारूचे ६१ बॉक्स जप्त करण्यात आले. उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अवैध दारुची वाहतुक रोखण्यासंदर्भात इन्सुली तपासणी नाक्यावर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना बांद्याहून इन्सुलीच्या दिशेने येणारी इनोव्हा कार (एमएच ०७ क्यू ९०५४) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी ड्रायव्हर सीटच्या मागे ठेवलेल्या विविध ब्रॅण्डचे गोवा बनावटीचे एकूण ६१ दारुचे बॉक्स (किंमत ४ लाख ५१ हजार २००) व ७ लाखांची कार असा एकूण रुपये ११ लाख ५१ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी चेतक भरत वाळवे याला ताब्यात घेण्यात आले.
जिल्हा अधिक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक एस. पी. मोहिते यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये परिविक्षाधीन उप अधीक्षक आर. ए. इंगळे, दुय्यम निरीक्षक प्रवीण एस. रास्कर, सांगली निरीक्षक प्रशांत रासकर, दुय्यम निरीक्षक शंकर रणपिसे, जवान एस. जी. मुपडे, जवान संतोष वेदे, राकेश बनसोडे यांनी सहभाग घेतला. या संदर्भात सखोल तपास निरीक्षक एस. पी. मोहिते करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)