तुमच्या गुगली आम्ही ओळखतो : सुदेश आचरेकर…
राज्य सरकार आणि महावितरण जनतेच्या खिशातून चोरी करुन पैसे काढायचे धंदे करत असल्याचा सुदेश आचरेकर यांचा आरोप...!
आचरेकरांनी ‘सिक्युरिटी डिपाॅझीट बिलांबाबत सामान्य जनतेला दिलासा नाही’ तर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचे माजी नगराध्यक्ष व भाजपा नेते सुदेश आचरेकर यांनी माजी नगरसेवक दीपक पाटकर आणि सहकार्यांसोबत आज महावितरणच्या कार्यालयाला धडक दिली. यावेळी
महावितरणचे अधिकारी श्री साखरे यांना निवेदन दिले.
महावितरणने मार्च महिन्याच्या बिलासोबत स्वतंत्र डिपाॅझीटची बीले पाठविल्याने ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. व्याज व ग्राहकांच्या फायद्याचे गणित सांगुन महावितरण कोट्यावधी रुपये ग्राहकांच्या खिशातून काढण्याचा कट रचत आहे. या अवास्तव बिलामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. कारण यापूर्वी कोरोनाच्या काळात २०० युनीट मोफत विज देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. त्यामुळे अनेक ग्राहकांनी वीज बिलात सवलत मिळेल या भाभड्या आशेने बील भरण्यास उशीर केला आणि त्यानंतर उर्जामंत्र्यांनी घुमजाव केले. या सर्व गुंतागुंतीत बील रक्कम वाढली.तरीही ग्राहकांनी टप्प्याटप्प्याने व्याजासह बीले भरली. कोरोनाच्या काळात ऑनलाईन बिले भरण्याच्या महावितरणच्या आवाहनाला ही ग्राहकांनी साथ दिली. काहींनी व्याजासह रक्कम भरून वीजपुरवठा सुरळीत ठेवला.
परंतु आता महावितरणने कोळशाचा अपुरा पुरवठा असल्याचे कारण देत ग्रामीण भागात भारनियमनाला सुरुवात केली आहे. त्यातच सामान्य जनतेसाठी अघोरी प्रकार म्हणजे सध्या येणारी सिक्युरीटी डिपाॅझीटची स्वतंत्र बिले.
आधीच हातात पुरेसा रोजगार नाही, अनेकांचे उद्योग मोडकळीस आलेले असताना, काहींनी स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत असताना तुट भरून काढण्यासाठी महावितरण सिक्युरीटी डिपाॅझीटची नवीन गुगली काढली आहे. ही बिले नुकतीच शहरात महावितरणने पाठवली आहेत. दोन्हीही बीले एकाचवेळी आल्याने ही अतिरिक्त रक्कम सामान्य ग्राहक कशी काय भरणार आणि का भरावी असा सवाल सुदेश आचरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.
एकीकडे लाईट बिल भरणे, लाईट बील वसुली यात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल असताना, तसेच वीजचोरीही सिंधुदुर्गात नसताना लोडशेडिंग करणे म्हणजेच सिंधुदुर्गवासीयांवर अन्याय आहेच म्हणुनच या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच महावितरणाच्या वरीष्ठांचे व शासनाचे लक्ष वेधून त्यांचा लुटीचा डाव आम्हाला व सामान्य जनतेला आता समजतो आहे हे सांगण्यासाठी आपण ही धडक भेट दिल्याचेही सुदेश आचरेकर यांनी महावितरणच्या अधिकार्यांना स्पष्ट केले.
ह्या सिक्युरिटी डिपाॅझीट बिलांबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास पंधरा दिवसांत तीव्र आंदोलनाचाही इशारा सुदेश आचरेकर यांनी महावितरणच्या अधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यासोबत माजी नगरसेवक दीपक पाटकर,माजी नगरसेवक पिल्या मुणगेकर, भाजयुमो शहर अध्यक्ष ललित चव्हाण,प्रमोद करलकर व इतर सहकारी ,पदाधिकारी व सामान्य नागरीक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)