वरची देवली येथील शेंडावाडी चव्हाण परिवार (वाघवणे) यांच्यातर्फे विविध सामाजिक व्यक्तिमत्वांचा सत्कार..!
मालवण | सुयोग पंडित : मालवण तालुक्यातील वरची देवली येथे गुढीपाडव्याचे आणि हिंदू नववर्ष यांचे औचित्य साधून शेंडावाडी चव्हाण परिवार, वाघवणे यांनी आपल्या मांडाच्या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला. फार पूर्वीपासून या मांडावर गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी गणपतीचे सोंग दाखवून त्याची पूजा-अर्चा करण्याची प्रथा चालत आली आहे. त्यामुळे या सत्कार समारंभाची सुरवात देखील शेंडावाडी चव्हाण परिवाराकडून आपल्या या पारंपरिक पद्धतीने गणपतीच सोंग दाखवून व त्यांचे पूजन करून करण्यात आली.
झाडे लावा झाडे जगवा हा संदेश लोकांपर्यंत पोहचावा म्हणून सत्कार समारंभात पुष्पगुच्छ म्हणून पोफळ तथा सुपारीचे रोप देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. गायत्री चव्हाण (सरपंच, मौजे देवली) श्री. भाऊ चव्हाण (उपसरपंच, मौजे देवली) उपस्थित होते. तसेच श्री. कमलेश गोवेकर (ग्रामपंचायत सभासद, मौजे देवली),श्री. हेमंत चव्हाण (ग्रामपंचायत सभासद, मौजे देवली), श्री. शामा मेस्त्री (माजी तंटामुक्ती अधिकारी, ग्रामपंचायत मौजे देवली) हे मान्यवर देखील विशेष आमंत्रित होते.
यावेळी श्री. भक्तप्रल्हाद मुकुंद चव्हाण (शेंडावाडी, वाघवणे) यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांच्या वतीने वर्ष २०२१-२२ मध्ये खरीप हंगामात घेतलेल्या भात पीक स्पर्धेमध्ये संपूर्ण तालुक्यातून श्री. भक्तप्रल्हाद मुकुंद चव्हाण यांनी प्रति गुंठा ८२.६५ पीक घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.
कु. अंकिता जयवंत चव्हाण. (शेंडावाडी, वाघवणे)
अंकिता हिने वर्ष २०१८-१९ मध्ये रशिया येथे ऑल अल्पागुट तुरान मार्शल आर्ट्स वर्ल्डचॅम्पिअनशिप (All Alpagut Turan Martial Arts World Championship) या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना मार्शल आर्ट्समधील ऑपरा (फुल कॉन्टॅक्ट)/ Aupara (Full Contact) या स्पर्धेत गोल्ड मेडल व गुरशाग (ग्रेपलिंग)/ Gurshag (Grappling) या स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले आणि रशियामध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या वर्ल्डचॅम्पिअनशिपमध्ये टर्की, कझाखस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मलेशिया, साऊथ आफ्रिका यासारख्या जगभरातील १८ ते २० देशांनी सहभाग घेतला होता.
डॉ. सौ. सुमेधा सुदर्शन नाईक यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सुमेधा नाईक या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण इथे प्राध्यापिका असून विविध सामाजिक कार्यांमध्ये नेहमीच मोलाचे योगदान देत असतात.
त्यांनी २०१९ साली मुंबई विद्यापीठातून बिजनेस इकॉनॉमिक्स विषयांत पीएचडी पदवी मिळवली आणि त्यानंतर जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायांच्या सेवा गुणवत्तेचे मोजमापन या विषयावर शोध प्रबंध सादर केला आणि तो शासनाकडे सुपूर्त केला. या योगदानाची दखल घेत २०२० साली मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेकडून त्यांना भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. महिला सबलीकरणासाठी पुढाकार घेऊन गावातील महिलांसाठी स्पर्धा आयोजित करणे, उपक्रम राबवणे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लेख लिहिणे या कार्याबद्दल त्यांची विशेष प्रशंसा होते.
इतर सत्कारमूर्तींमध्ये श्री. आप्पा मांजरेकर ,श्री. रमेश नाईक,श्री. सचिन विश्राम चव्हाण,श्री. किशोर अनंत चव्हाण,श्री. अनिल रावजी चव्हाण,श्री. तुषार अनंत चव्हाण आणि परिवार,श्री. नरेश चव्हाण आणि मित्र परिवार,श्री. तुषार रघुनाथ चव्हाण (कृषिमित्र) यांचाही समावेश होता.
सर्व सत्कारमूर्तींचे देवली पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)