कणकवलीत सुरू होणारे 'पदर प्रतिष्ठान' करणार सिंधुदुर्गातील महिलांचे सक्षमीकरण..!
8 मार्च रोजी नीलम राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील महिलांसाठी पदर प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कणकवली शहरात पदर प्रतिष्ठानच्या वतीने पदर प्रतिष्ठान स्थापन करण्यामागे महिलांचा सन्मान, महिलांचे सक्षमीकरण व्हावे, कणकवली शहरातील महिला निर्भीड व्हाव्या हा उद्देश असल्याचे संस्थापक नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.
प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम केले जाणार आहेत. या मंडळामध्ये कणकवली शहरातील 300 महिला सभासद आहेत. ही संख्या हजार पर्यन्त नेण्याचा मानस आहे. सर्व सभासद महिलांना विमा संरक्षण मोफत दिले जाणार आहे. पदर प्रतिष्ठानचे उद्घाटन 8 मार्च रोजी विद्यामंदिर हायस्कुलच्या पटांगणावर सायंकाळी 5 वाजता भव्य स्वरूपात केले जाणार आहे. सौ. नीलम राणे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे उद्घाटन नंदिता नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. उद्घाटनानिमित्त होम मिनिस्टर स्पर्धा घेतली जाणार आहे. प्रथम विजेत्याला फ्रीज, दुसरे वॉशिंग मशीन, तिसरे कुलर, चौथे आणि पाचवे मिक्सर बक्षीस दिले जाणार आहे. सहभागी प्रत्येक स्पर्धक महिलेला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. प्रेक्षक महिलांसाठी लकी ड्रॉ काढणार असून 25 लकी विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. उद्घाटन समारंभानिमित्त पडवे मेडिकल कॉलेज आणि पदर प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर सकाळी नगरपंचायतच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये भरविण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिरात स्त्रियांची कॅन्सर टेस्ट तसेच जनरल तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात रोगाचे निदान झालेल्या सर्व महिलांच्या मोफत शस्त्रक्रिया पदर प्रतिष्ठान आणि पडवे मेडिकल कॉलेजच्या वतीने केले जाणार असल्याचेही संस्थापक तथा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले आहे.
पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण असून उपाध्यक्ष हर्षदा हर्षल गव्हाणकर, सचिव मीरा प्रवीण कवडे, खजिनदार सुप्रिया समीर नलावडे आहेत. सदस्यपदी संजीवनी पवार, दिशा अंधारी, अंकिता कर्पे, प्रियाली कोदे, साक्षी वाळके, विनिता राणे, दिशा राणे, सल्लागार कविता किशोर राणे, प्रतीक्षा सावंत वर्षा बांदेकर, मेघा सावंत यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती नलावडे यांनी दिली. यावेळी पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)