राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा - कणकवलीत हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
कणकवली / उमेश परब – स्वातंत्र्यदिनाच्या काळात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कणकवली तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले . यावेळी समितीचे श्री. जयवंत सामंत आणि श्री. श्रीधर मुसळे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि , राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (१०३/२०११) दाखल करण्यात आली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याचसमवेत महाराष्ट्र शासनानेही राज्यात ‘प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारही ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाविरोधी आहे.
यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०’, कलम २ आणि ५ नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ ‘चे कलम २ नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे.
राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम गेली २० वर्षे राबवते. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्तकदिनी ध्वजारोहणाच्या वेळी ‘झंडा ऊँचा रहे हमारा’, असे अभिमानाने म्हटले जाते; पण त्याच वेळी लहान मुलांच्या हट्टापोटी खेळण्यासाठी घेतलेले किंवा वाहनांवर लावण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे रस्त्यावर अन् नंतर कचराकुंडीत पहायला मिळतात, तसेच ते पायदळी तुडवले जातात. काही जण तिरंग्याच्या रंगाप्रमाणे चेहरा रंगवतात. यामुळे स्वातंत्र्यदिनीच राष्ट्रध्वजाचा घोर अवमान होत आहे, याची जाणीवही आपल्याला होत नाही. क्रांतिकारकांनी जो ध्वज भूमीवर पडू नये, यासाठी लाठ्या खाल्ल्या, वेळप्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले, त्यांच्या बलिदानाची ही क्रूर चेष्टाच नव्हे का? राष्ट्रध्वजाचा मान राखणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तरी जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करतात, ज्या व्यक्ती, संस्था ,तसेच समूह राष्ट्र ध्वजाचा अवमान करतात त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)