एका व्यावसायिकाची काव्य तुतारी....! ( संपादकीय विशेष )
मालवण | सुयोग पंडित (संपादकीय): सावंतवाडीतील सुप्रसिद्ध असा तुतारी काव्य सोहळा..! कै.विद्याधर भागवत काव्यमंच….! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोमसापच्या अव्वल दिग्गजांची रसिक व सादरकर्ते म्हणून उपस्थिती आणि त्यातील एक नांव जिल्ह्यातील आघाडीच्या व्यावसायिकाचे..! आघाडीचा व्यावसायिक हे नांव ऐकताना किंवा वाचताना वरील इतर वर्णनांमध्ये कसे काय असा प्रश्न पडला तर त्याचे उत्तर मालवणचे मत्स्य व्यावसायिक व समाज अभ्यासक श्री.रुजारिओ पिंटो असे मिळेल.रुजारिओ पिंटो हे नांव जसे दुसर्या तुतारी संमेलनाचे आकर्षण ठरले तसे ते नांव गेली पंचवीस वर्षे मराठी, मालवणी व कोंकणी साहित्य क्षेत्रातील एक ठळक ओळख बनून कलेच्या दर्यात त्याचे शब्दांचे गलबत चालवताना रसिकांना दिसतेच.”माय” म्हणजे आई…”ज्याला आई नाही त्याची व्यथा” मांडलेली त्यांची कविता अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतली तशीच सर्वांना कार्यरत ठेवायचे आवाहन करणार्या ” चलता त्याचा हलता आणि बसता त्याचा चेपाटता..”, सारख्या त्यांच्या काव्यपंक्ती अगदी उद्योग, नोकरी या सगळ्यातील तत्व शिकवून गेल्या.आईची महती,पर्यावरणाची जाण,रस्ता सोडून जाणार्या तरुणाईला भान दाखवणारे शब्द आणि अगदी स्वतःच्या आवारातून चंद्राच्या रुपात प्रेयसीला पाहणारा प्रियकर या व अशा अनेक छटा घेऊन जीवन लिहू पहाणारा साहित्यिक आहेत रुजारिओ पिंटो.तुतारी संमेलन,कोमसाप व इतर अनेक साहित्य विधींमध्ये स्वतःच्या यशस्वी उद्योजकतेचा सदरा आपल्या घरीच टांगून ठेवून ही व्यक्ती एक निव्वळ साहित्यप्रेमी व वाचन दुवा बनून समाजात वावरते.अफाट,अचाट व अवघड दर्यातून म्हणजे समुद्रातून अनेक उलाढाली करणारा व अनेकांना रोजगार देणारा एखादा माणुस त्याच्या शब्दाचे गलबत कधीच भरकटू देत नाही हेही विशेष…! मालवणच्या या साहित्यिकाचे ऐन नाताळ काळात सावंतवाडीतील दुसर्या तुतारी संमेलनातील काव्यवाचन म्हणजे रसिकांसाठी एक सांताक्लाॅज भेटच ठरली..! रुजारिओ पिंटोरुपी साहित्याचे अथांग जाळे “फडफडीत शब्दरुपी खेळकर मासे” रसिकांसाठी विविध मंच तथा किनार्यांवर आणतच राहील या सदिच्छा..!
सुयोग पंडित (मुख्य संपादक/आपली सिंधुनगरी चॅनेल)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)